नवी दिल्ली : ‘संयुक्त राष्ट्रां’नी २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ जाहीर केल्यानिमित्त मंगळवारी संसदभवनात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्या पुढाकाराने खासदारांसाठी ‘विशेष भोजन’ आयोजित केले होते. बाजरीची खीर, बाजरीचा केक, नाचणीचा डोसा, नाचणी भाकरी, ज्वारीची भाकरी, भरड धान्यांपासून बनवलेली खिचडी अशा स्वादिष्ट खाद्यपदार्थाची रेलचेल होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भरडधान्यांपासून बनवलेल्या वेगवेगळय़ा  पदार्थाचा आस्वाद घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांमुळे हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार असल्याचे केंद्रीयमंत्री तोमर म्हणाले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा हा अखेरचा आठवडा असल्याने खासदारांसाठी मंगळवारी भरडधान्यांच्या खाद्यपदार्थाचे भोजन आयोजित केले होते. त्यासाठी खास कर्नाटकमधून आचारी आले होते. मोदींनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पंगतीत रुचकर पदार्थाचा स्वाद घेतला.

भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीतही मोदींनी भरडधान्य वर्षांचा आवर्जून उल्लेख केला. २०२३ मधील ‘जी-२०’ परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले असून यानिमित्त देशभर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये परदेशी पाहुण्यांनाही भरडधान्यांचे खाद्यपदार्थ खाऊ घाला. हे पदार्थ पौष्टिक असल्याने त्यांचा प्रचार-प्रसार केला पाहिजे. त्यासाठी जनमोहीम उभी करा, त्याअंतर्गत गाण्याच्या स्पर्धा, निबंध स्पर्धा, शाळांमध्ये चर्चेचे कार्यक्रमही आयोजित करा, अशी सूचना मोदींनी भाजपच्या खासदारांना केली. भरडधान्यांच्या उत्पादन व विक्रीला चालना देण्यासाठी संसदेच्या बैठकांमध्ये या पदार्थाचा वापर करा. बाजरी, ज्वारी, नाचणी, वरई, कोदो अशा भरडधान्यांपासून बनवलेल्या पदार्थाचा वापर वाढला तर छोटय़ा शेतकऱ्यांनाही लाभ होईल, असे मोदी म्हणाल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A special feast of coarse grains in parliament savor delicious food mps along with prime minister ysh
Show comments