Canada Accident : कॅनडामधील व्हँकुव्हरमध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. व्हँकुव्हरमध्ये एका स्ट्रीट फेस्टिव्हलच्या दरम्यान एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने अनेकांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून काहींचा मृत्यू झाल्याची माहिती सांगितली जात आहे. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं आहे.

व्हँकुव्हरमध्ये शनिवारी रात्री एक उत्सव सुरु होता. या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. मात्र, यावेळी गर्दीत एक भरधाव वेगाने आलेल्या एका कारने अनेकांना चिरडलं. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच या घटनेत अनेकजण जखमी झाले असून त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, व्हँकुव्हरमध्ये घडलेल्या घटनेनंतर घटनास्थळी तात्काळ पोलिसांनी धाव घेतली. या कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेची पुढील चौकशी सुरु असल्याची माहिती व्हँकुव्हरच्या पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला? याची अधिकृत माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रस्त्यावर अनेक लोक पडलेले दिसत आहेत.

व्हँकुव्हर पोलिसांनी काय म्हटलं?

व्हँकुव्हरमध्ये घडलेल्या घटनेसंदर्भात पोलिसांनी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, “व्हँकुव्हरमधील ई.४१ व्या अव्हेन्यू आणि फेसर येथे हा स्ट्रीट फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव वेगाने येणारी एक कार गर्दीत घुसली आणि अनेक लोकांना चिरडलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चेंगराचेंगरी झाली आणि लोकांनी एकमेकांना पायदळी तुडवलं. या यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी कार आणि चालकाला अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे”, असं म्हटलं आहे.