चोरी केल्यानंतर पाइपच्या आधारे उतरताना नवव्या मजल्यावरुन खाली पडून चोराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गाजियाबादमध्ये ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरील फ्लॅटमध्ये चोरी केल्यानंतर चोर खालच्या फ्लॅटमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात होता. याचवेळी सुरक्षा रक्षकाची नजर चोरावर पडली. घाबरल्याने चोराचा तोल गेला आणि खाली पडला. पोलिसांनी चोराला रुग्णालयात नेलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. चोराकडे एक मोबाइल मिळाला असून त्याच्याआधारे ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नवव्या मजल्यावर राहणारे सुमित आपल्या पत्नीसोबत रात्री घरी आले तेव्हा घरातील सर्व सामान विस्कटलेल्या अवस्थेत होतं. त्यांनी लगेच शेजाऱ्यांना याची माहिती दिली. शेजाऱ्यांनी मुख्य गेटवर तैनात सुरक्षा रक्षकांना यासंबंधी कळवलं. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी इमारतीकडे धाव घेत पाहणी केली असता नवव्या मजल्यावर एक तरुण पाइपच्या सहाय्याने खाली उतरत असल्याचं दिसलं.
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी चोराला आवाज देत खाली येण्यास सांगितलं. सुरक्षा कर्मचाऱ्याने गोळी मारण्याची धमकीही दिली. यावेळी तोल गेला आणि चोर खाली पडला. पोलिसांना कळवलं असता घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी चोराला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी चोराला मृत घोषित केलं.