एपी, माराकेश : मोरोक्कोमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या माराकेशला शुक्रवारी रात्री शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. यात एक हजाराहून अधिक नागरिक ठार झाले असून, अॅटलास पर्वतराजीतील खेडय़ांपासून माराकेशच्या ऐतिहासिक शहरापर्यंत अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.
६.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या दुर्गम भागात पोहोचण्याचे प्रयत्न बचावकार्यातील स्वयंसेवक करत असून, भूकंपबळींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. भूकंपामुळे जागे झालेले लोक भीतीने रस्त्यांवर धावले. त्यानंतर उशिरा रात्री माराकेशच्या रस्त्यांवर अनेक जण गोळा झाले असून, अद्यापही अस्थिर असलेल्या इमारतींच्या आत जाण्यास घाबरत आहेत, अशी दृश्ये सरकारी दूरचित्रवाहिनीने दाखवली.
इमारतींच्या ढिगाऱ्याखाली कुणी जिवंत आहे काय याचा आकस्मिक सेवेचे कर्मचारी शोध घेत होतो. माराकेशमधील बाराव्या शतकात बांधल्या गेलेल्या प्रसिद्ध कौतोबिया मशिदीचे नुकसान झाले, मात्र त्याचे प्रमाण किती हे लगेच कळू शकले नाही. प्रामुख्याने माराकेशमध्ये आणि भूकंप केंद्राजवळील पाच प्रांतांमध्ये किमान १०३७ लोक मरण पावले असून, १२०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत, असे मोरोक्कोच्या अंतर्गत मंत्रालयाने सांगितले. जखमींपैकी ४०० जणांची प्रकृती गंभीर आहे.