उबेर या टॅक्सीसेवा देणाऱ्या अॅप बेस अमेरिकन कंपनीने एशिया पॅसिफिक बिझनेस प्रेसिडेंट एरिक अलेक्झांडर यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. २०१४ साली दिल्लीत उबेर टॅक्सीमध्ये एका महिलेवर ड्रायव्हरने बलात्कार केला होता. शिवकुमार यादव असे त्या नराधमाचे नाव होते. या प्रकरणातल्या पीडित महिलेचा वैद्यकिय अहवाल आणि इतर माहिती गोळा केल्याचा आरोप एरिक यांच्यावर होता. ज्यामुळेच त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांसोबत भेदभाव करणाऱ्या, महिलांना त्रास देणाऱ्या आणि कोणत्याही प्रकारचे चुकीचे वर्तन करणाऱ्या २० कर्मचाऱ्यांना हाकलले आहे.

एरिकने २०१४ मध्ये बलात्कार पीडित महिलेचे रेकॉर्ड मागवून ते सिनीयर व्हाईस प्रेसिंडटना दाखवले होते. तसेच या प्रकरणी त्याने कंपनीतल्या इतर कर्मचाऱ्यांशी चर्चा केली होती. एवढेच नाही तर तिच्यासंबंधीच्या नोंदी असलेली फाईलही अनेकांना दाखवली होती. रिकोड या वेबसाईटनं या संदर्भात सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. त्यामुळे एरिकवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. पीडित महिलेसंदर्भातली फाईल जेव्हा उबेर कंपनीच्या लीगल डिपार्टमेंटकडे पोहचली तेव्हा त्यांनी ही फाईल नष्ट केली. त्यानंतर आता मंगळवारी एरिक आलेक्झांडर यांना काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे.

२०१४ मध्ये जेव्हा उबेर टॅक्सीमध्ये महिलेवर बलात्कार झाला होता त्या घटनेनंतर २०१५ पर्यंत दिल्लीत उबेर टॅक्सीवर बंदी घालण्यात आली होती. ज्या २० कर्मचाऱ्यांना या आधी कामावरून हाकलण्यात आले त्या समूहात अलेक्झांडर नव्हते. मात्र कंपनीच्या कायदा विभागाला २०० संस्थांकडून मिळालेल्या माहितीत अलेक्झांडर यांच्या या प्रकरणाचाही उल्लेख होता. ज्यानंतर अलेक्झांडर यांच्या नोकरीवर गदा आली आहे.

Story img Loader