पीटीआय, नवी दिल्ली
भारतामध्ये आतापर्यंत कोविड-१९ चा उपप्रकार असलेल्या जेएन.१ चे एकूण १,२०० रुग्ण नोंदवण्यात आले आहेत अशी माहिती ‘इंडियन सार्स सीओव्ही-२ जिनॉमिक्स कन्सॉर्टियम’ (इन्साकॉग) या संस्थेने शनिवारी दिली. देशातील १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
‘इन्साकॉग’च्या आकडेवारीनुसार जेएन.१ चे कर्नाटकात सर्वाधिक म्हणजे २१५ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेशात १८९, महाराष्ट्रात १७० तर केरळमध्ये १५४ रुग्णसंख्या आहे. पश्चिम बंगाल, गोवा, तमिळनाडू आणि गुजरातमध्येही जेएन.१ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. तेलंगण, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, ओडिशा, उत्तराखंड, नागालँड या राज्यांमध्येही जेएन.१चे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत.
हेही वाचा >>>“आम्हाला धमकावण्याचा परवाना…”, चीनवरून परतल्यावर मालदीवच्या अध्यक्षांनी भारताकडे डोळे वटारले
केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येवर सातत्याने आणि बारकाईने लक्ष ठेवायला सांगितले आहे. दुसरीकडे, देशभरात कोविड-१९ विषाणूचा संसर्ग झालेले नवीन ४४१ रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन ती ३,२३८ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये एकाही करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.