राजकारणाने झाकोळलेल्या राजधानी दिल्लीतली राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाची वास्तू मात्र अनेक कलावंतांना घडवणारी, सांस्कृतिक व सामाजिक जाणिवांना नाटय़कलेतून विकसित करणारी. या वास्तूशी गो. पु. देशपांडे यांचा तब्बल ४० वर्षांचा स्नेह होता. चीनचे अभ्यासक, जागतिक राजकारणाचे साक्षेपी भाष्यकार असलेले गो. पु. देशपांडे यांचे नामकरण दिल्लीतील त्यांच्या चाहत्यांनी ‘जीपीडी’ केले होते आणि या चाहत्यांसह गोपुंच्या गप्पांचा फडदेखील याच वास्तूत रंगत असे. गोपुंच्या स्मृतींना म्हणूनच याच वास्तूच्या छायेत त्यांच्या चाहत्यांनी बुधवारी उजळा दिला.
राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात गो. पु. यांचा त्यांचे चाहते व विद्यार्थ्यांशी होणाऱ्या चर्चाचा परीघही व्यापक असे आणि त्यात अनेकांना नवी प्रेरणा, नवी ऊर्जा मिळत असे. या अनुभवांची देवाणघेवाण बुधवारी झाली.
गोपुंच्या आठवणी सांगताना विद्यमान संचालक प्रा. वामन केंद्रे म्हणाले की, १९७३ साली पुण्यात झालेल्या नाटय़ कार्यशाळेत ‘उद्ध्वस्त धर्मशाळेचे लेखक’ म्हणून गोपुंचा नवा परिचय झाला. ही कार्यशाळा म्हणजे मराठीतील वैचारिक राजकीय नाटकांच्या एका नव्या पर्वाचा प्रारंभ होती. कार्यशाळेचे आयोजनकर्ते सत्यदेव दुबे यांच्याशी जुळलेला गोपुंचा स्नेह पुढे वृद्धिंगत झाला. भारतीय नाटय़ चळवळीत गोपुंनी दिलेले योगदान शब्दात मांडता येण्यासारखे नाही, अशीच भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या वेळी गो.पु. देशपांडे यांचे चिरंजीव सुधन्वा देशपांडे, ज्येष्ठ नाटककार नामवर सिंह, मोलेश्री हाश्मी यांच्यासह विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A tribute to govind purushottam deshpande from delhi people
Show comments