प्रभू रामाचं मंदिर अयोध्येत उभारण्यात आलं आहे. २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठाही केली जाणार आहे. यानिमित्ताने उत्सवांनाही सुरुवात होते आहे. अयोध्येला उत्सवाचं स्वरुप आलं आहे. मात्र याच प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन राजकारणही रंगलं आहे. काँग्रेसने हा कार्यक्रम भाजपप्रणित असल्याचं म्हटलं आहे आणि या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. स्वामी रामभद्राचार्यांनी माझ्या दोन प्रतिज्ञा पूर्ण झाल्या आता पाकव्याप्त काश्मीर मिळावं म्हणून यज्ञ सुरु केला आहे असं म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे स्वामी रामभद्रचार्यांनी?
१४ वर्षांच्या वनवासानंतर जेव्हा भगवान राम हे अयोध्येला परतले तेव्हा अयोध्यावासीयांना जसा आनंद झाला होता तसाच आनंद आज मलाही होतो आहे. प्रभू रामचंद्रांचं मंदिर होतं आहे त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. मी दोन प्रतिज्ञा केल्या होत्या. अयोध्येत कथा सांगायला येईन जेव्हा रामजन्मभूमीचा निर्णय होईल. तर दुसरी प्रतिज्ञा ही केली होती की रामकथा सांगत असताना राम राज्यभिषेकाचा उत्सव तेव्हाच साजरा करेन जेव्हा निर्णय आमच्या बाजूने लागेल. या दोन्ही प्रतिज्ञा देवाने पूर्ण केल्या याचं मला समाधान आहे असं स्वामी रामभद्रचार्यांनी म्हटलं आहे.
पाकव्याप्त काश्मीरसाठी यज्ञ
“आम्ही पाकव्याप्त काश्मीर भारताला परत मिळावा म्हणून यज्ञ सुरु केला आहे. त्रेतानंतर आत्ताच निष्काम यज्ञ आहे. प्रत्येक यज्ञ कुठल्या तरी विशिष्ट इच्छेने केला जातो. मात्र आमची इच्छा इतकीच आहे पाकव्याप्त काश्मीरचा समावेश भारतात व्हावा. बाकी कुठलीही इच्छा नाही. मात्र आम्हाला खात्री आहे की पाकव्याप्त काश्मीर परत भारतात येईल. हनुमानावर आमची प्रगाढ श्रद्धा आहे. हनुमानाने माता सीतेचा शोध घेतला, त्यांना परत आणण्यासाठी प्रभू रामाची मदत केली. तर पाकव्याप्त काश्मीर काय मोठी गोष्ट आहे? ते आपली भूमीही परत आणतील.” असंही रामभद्राचार्य यांनी म्हटलं आहे.
रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा शास्त्रानुसारच होते आहे. राम मंदिराचा गाभारा बांधला गेला आहे. तो अर्धवट नाही. त्यामुळे तिथे प्राणप्रतिष्ठा होते आहे. आता रामाचं बाहेरील मंदिर तयार होईल. पुनर्वसु नक्षत्रदेखील आहे, त्रेताची छायाही आहे. योग्यवेळी रामाची प्रतिष्ठापना होते आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान ११ दिवस फक्त दुग्ध आहार करत आहेत. ११ दिवस ते अन्नग्रहण करणार नाहीत. असा पंतप्रधान तुम्ही पाहिला आहे का? असंही रामभद्राचार्यांनी म्हटलं आहे.