Aadar Poonawala लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यम यांनी आठवड्याला ९० तास काम करण्याची सूचना केली होती. त्यावरुन सुरु झालेली चर्चा अद्यापही संपलेली नाही. रविवारी सुट्टी न घेताही ९० ता काम करा असा सल्ला त्यांनी दिला होता. यावरुन बरीच चर्चा रंगली होती. आता यावर सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी याबाबत मत व्यक्त केलं आहे.

सुब्रमण्यम यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं?

सुब्रमण्यम यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, या व्हिडिओमध्ये सुब्रमण्यम म्हणाले की, “मला खूप वाईट वाटतं जेव्हा मी माझ्या कर्मचाऱ्यांना रविवारीसुध्दा कामाला बोलावू शकत नाही. जर मला त्यांना रविवारी पण कामाला लावता आले तर मला खूप आनंद होईल. घरी बसून तुम्ही तुमच्या बायकोच्या चेहऱ्याकडे किती वेळ बघत बसणार आहात ? चला ऑफिसला जाऊन काम करुया. मी स्वत: रविवारी काम करतो. याआधी इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायणमूर्ती यांनी या आधी तरुणांनी आठवड्याला ७० तास काम करायला असे विधान केलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली होती. तसंच सुब्रमण्यम यांच्यावरही टीका झाली. या चर्चांवर आता अदर पूनावाला यांनीही त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

अदर पूनावाला काय म्हणाले?

“मला वाटतं लोकांनी कठोर परिश्रम घेणं महत्त्वाचं आहे. याबाबत कुठलंही दुमत असण्याचं काही कारण नाही. मात्र ज्यांनी ९० तास काम केलं पाहिजे असं वक्तव्य केलं त्याबद्दल मला इतकंच वाटतं कधी कधी तुम्हाला असं काम करावं लागतं ते ठीक आहे. मात्र दररोज ८-९ तासांपेक्षा जास्त काळ तुम्ही कार्यरत राहू शकत नाही. सामाजिक आयुष्य जगणं, तुमचं आयुष्य संतुलित असणं आवश्यक आहे. असं केलं तरच तुम्ही नव्या उत्साहाने काम करु शकता. सुट्टीच्या दिवशी नातेवाईकांना भेटणं असो, मित्रांना भेटणं असो किंवा इतर कामं करणं असो त्यातूनच जोमाने काम करण्याची उर्जा मिळते असं मला वाटतं.” असं अदर पूनावालांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अथक परिश्रमांना पर्याय नाही हे मान्य पण..

अदर पूनावाला म्हणाले, “कधी कधी अशी वेळ येते की तुम्हाला ८ ते ९ तासांहून अधिक काम करावं लागतं. कधी कधी अशी वेळ येणं मान्य. मात्र सोमवार ते रविवार तुम्ही ऑफिसला जाऊन काम करु शकत नाही. असं कुणीही करणं हे जरा अव्यवहार्य आहे. तुम्ही जर उद्योजक असाल, तुमचा व्यवसाय मोठा करायचा असेल तर अथक परिश्रमांना दुसरा कुठलाही पर्याय नाही. मात्र रोज १० तास, १२ तास काम करणं असं करु शकत नाही.” असंही मत अदर पूनावाला यांनी मांडलं आहे.

Story img Loader