Aadhaar Card : सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड हे जन्माचा पुरावा म्हणून मान्य नाही असं म्हटलं आहे. जस्टिस संजय करोल आणि जस्टिस उज्जल भुइयां यांच्या खंडपीठाने या संबंधीचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालायने हे म्हटलं आहे की मृत व्यक्तीचं वय ठरवण्यासाठी आधार कार्डवर ( Aadhaar Card ) उल्लेख करण्यात आलेल्या जन्म तारखेऐवजी शाळा सोडल्याचा दाखला हा ग्राह्य धरावा.
काय आहे हे प्रकरण?
मोटार अपघात संबंधीचा दावा होता. ज्यामध्ये नुकसान भरपाई म्हणून १९ लाख ३५ हजार ४०० रुपये भरपाई देण्याचा निर्णय दिला गेला. उच्च न्यायालयाने ही रक्कम कमी करुन ९ लाख २२ हजार ३३६ रुपये केली. अपघातात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीचं मृत्यूच्या वेळी असलेलं वय ठरवण्यासाठी आधार कार्डवर ( Aadhaar Card ) असलेल्या जन्म तारखेचा उल्लेख ग्राह्य धरला होता. त्यानुसार मृत व्यक्तीचं वय ४७ धरलं होतं आणि उच्च न्यायालयाने भरपाईची रक्कम निम्मी केली होती.
सर्वोच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान
उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाला आव्हान देत याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी आधार कार्डवरची ( Aadhaar Card )जन्मतारीख आणि त्यानुसार ठरवण्यात आलेलं वय चुकीचं असल्याचं निरीक्षण नोंदवलं. तसंच आधार कार्डवरची जन्मतारीख वय ठरवण्यासाठी ग्राह्य धरली जाणार नाही असंही म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या निर्णयानुसार ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचं मृत्यूसमयी वय ४५ होतं. Live Law ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
हे पण वाचा- ‘लाडक्या बहिणीं’ची बँकांमध्ये झुंबड; आज अखेरचा दिवस, बँक खात्याशी आधार कार्ड जोडणीसाठी महिलांची गर्दी
सर्वोच्च न्यायालयच नाही तर इतर न्यायालयांचे निर्णयही असेच
मध्यप्रदेश न्यायालयानेही हे मान्य केलं आहे की जेव्हा वय निश्चित करायचं असेल तेव्हा आधार कार्ड (Aadhaar Card ) हा जन्माचा पुरावा मानता येणार नाही. मनोज कुमार यादव विरुद्ध मध्य प्रदेश राज्य या खटल्यात न्यायालयाने हा निर्णय दिला.
नवदीप सिंह विरुद्ध पंजाब राज्य आणि इतर यांनीही आधार कार्ड हे वयनिश्चितीसाठी पुरावा ग्राह्य धरता येणार नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील एका प्रकरणात बॉम्बे हायकोर्टाने आधार कार्ड हे जन्मतारीख ठरवण्यासाठी ग्राह्य धरु नये. तसंच गुजरात न्यायालयाने एका प्रकरणात शाळा सोडल्याचा दाखला हाच जन्म तारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरावा आधार कार्ड नाही असा निर्णय दिला आहे. आधार कार्ड हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. त्यावर आपल्या जन्मतारखेपासून ते घराच्या पत्त्यापर्यंतचे सगळे तपशील असतात. मात्र ते कार्ड आता जन्माचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही.