Manish Sisodia : दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया जवळपास दीड वर्ष तुरुंगात होते. मात्र, ९ ऑगस्ट रोजी मनीष सिसोदिया तिहार तुरुंगातून बाहेर आले. दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात सिसोदिया यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप होते. या प्रकरणात त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयने अटकेची कारवाई केली होती. दरम्यान, मनीष सिसोदिया तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आता पक्षाच्या कामाला लागले आहेत. आज (२२ सप्टेंबर) रोजी आम आदमी पक्षाच्या एका सभेत संबोधित करत असताना सिसोदिया यांनी भारतीय जनता पक्षासह केंद्रीय तपास यंत्रणांवरही गंभीर आरोप केले. तसेच “तुरुंगात असताना मला माझ्या मुलाची फी भरायला पैसे नव्हते, लोकांकडे भीक मागावी लागली”, असं म्हणत मनीष सिसोदिया यांनी खंत व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनीष सिसोदिया काय म्हणाले?

“तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात मला देखील भडकवण्याचा प्रयत्न केला. अरविंद केजरीवाल यांच्यापासून मला तोडण्याचा बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला सांगण्यात आलं की, अरविंद केजरीवाल यांनी तुमचं नाव घेतलं. आता तुम्ही देखील अरविंद केजरीवाल यांचं नाव घ्या. असं केलं तर तुमचा यामधून बचाव होईल”, असा आरोप सिसोदिया यांनी केला.

हेही वाचा : ‘मुलगा आईलाच डोळे दाखवायला लागला’, मोहन भागवत यांना ५ प्रश्न विचारत केजरीवाल यांची मोदींवर टीका

भाजपामध्ये येण्याची ऑफर होती

पुढे बोलताना सिसोदिया म्हणाले, “मला भाजपामध्ये येण्याची ऑफर आली होती. मला म्हणाले, तुम्ही निर्णय बदला. एवढंच नाही तर यावर मला स्वत:चा विचार करण्यास सांगितले होते. राजकारणात कोणी कोणाचा विचार करत नाही, असंही मला सांगण्यात आलं. मला माझे कुटुंब, माझी आजारी पत्नी आणि माझ्या मुलाबद्दल विचार करण्यास सांगितलं होतं”, असा दावा मनीष सिसोदिया यांनी केला आहे.

मुलाची फी भरण्यासाठी पैसे नव्हते

आपल्या भाषणात बोलताना सिसोदिया यांनी अटक झाल्यानंतर त्यांना आलेल्या अडचणींबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, “२००२ मध्ये मी पत्रकार असताना ५ लाख रुपयांचा एक फ्लॅट घेतला होता. मात्र, माझ्याकडून तो फ्लॅट देखील हिसकावून घेतला. माझ्या खात्यात १० लाख रुपये होते. ते देखील हिसकावून घेतले. माझे बॅक खाते सील करण्यात आले. मला माझ्या मुलाची फी भरण्यासाठी भीक मागावी लागली. मी त्यांना सांगितलं की मला माझ्या मुलाची फी भरावी लागेल, तरीही ईडीने माझे बँक खाते गोठवले”, असं सिसोदिया यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aam aadmi party leader manish sisodia on he had to beg people to pay the childs fees while in jail gkt