आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी पाठवलेली अब्रुनुकसानीची नोटीस फाडून टाकली आहे. खादी घोटाळा प्रकरणी नायब राज्यपालांनी ही नोटीस पाठवली होती. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल आणि आम आदमी पक्षामध्ये शीतयुद्ध सुरु असून, संजय सिंग यांनी नोटीस फाडल्याने त्यात भर पडली आहे.

राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी नोटीस फाडून टाकत राज्यपालांवर जोरदार टीका केली आहे. नायब राज्यपालांना त्यांच्या पदावरुन हटवून टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे.

“राज्यसभेचा खासदार या नात्याने मला सत्य बोलण्याचा अधिकार आहे. चोर, भ्रष्टाचारी लोकांनी पाठवलेल्या नोटीसला मी घाबरत नाही,” अशी टीका संजय सिंग यांनी नोटीस फाडण्याआधी केली.

“नायब राज्यपालांनी अडीच लाख कारागिरांचे पैसे लुटले आहेत. जेव्हा आम्ही त्यांचा भ्रष्टाचार उघड केला, तेव्हा त्यांनी कायदेशीर नोटीस पाठवली. लुटलेला पैसा कुठे ठेवला आहे याचा तपास करण्यासाठी सीबीआय, ईडी चौकशी झाली पाहिजे. मी १० वेळा अशा नोटीस फाडून फेकून देऊ शकतो,” असा संताप यावेळी त्यांनी व्यक्त केला.

आपल्याविरोधात अपमानास्पद आणि दुर्भाग्यपूर्ण आरोप केल्याचा दावा करत नायब राज्यपालांनी सोमवारी आप नेते अतिस्थी, सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक, संजय सिंग यांना नोटीस पाठवली होती. नोटीसमध्ये आप नेत्यांना “पक्षाच्या सर्व सदस्यांना आणि त्याच्याशी संबंधित सर्व व्यक्तींना, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, खोटी, बदनामीकारक, दुर्भाग्यपूर्ण आणि निराधार विधाने करण्यापासून आणि प्रसिद्ध करण्यापासून थांबवावं ” असे निर्देश जारी करण्यास सांगितलं होतं.

Story img Loader