दिल्लीतल्या मद्य धोरण प्रकरण उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांना तुरुंगात जावं लागलं आहे. मात्र या प्रकरणात आता रोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. आम आदमी पार्टीचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी मनिष सिसोदियांच्या अटकेप्रकरणी आता मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मनिष सिसोदियांना तिहारमधल्या क्रमांक १ च्या तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. कारण भाजपाला तुरुंगातच त्यांची हत्या घडवून आणायची आहे असा गंभीर आरोप भारद्वाज यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे सौरभ भारद्वाज यांनी?

तिहारच्या तुरुंग क्रमांक १ मध्ये फर्स्ट टाइम अंडर ट्रायल कैद्याला ठेवलं जात नाही. कारण या क्रमांक १ च्या तुरूंगात भयंकर क्रूर असे कैदी आहेत. हे कैदी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि मनोरूग्ण झालेले आहेत. एका छोट्याश्या इशाऱ्यावर ते कुणाचीही हत्या करू शकतात. अशा लोकांमध्ये मनिष सिसोदियांना ठेवण्यात आलं आहे. आम्ही भाजपाचे राजकीय विरोधक आहोत. पण अशा प्रकारचं शत्रुत्व कधी तुम्ही राजकारणात पाहिलं आहे का? भाजपा दिल्लीत आमचा पराभव करू शकली नाही त्यामुळे आता ते आमचा असा बदला घेणार का? असाही प्रश्न सौरभ भारद्वाज यांनी विचारला आहे. तसंच पंतप्रधान या सगळ्या प्रकरणात गप्प का बसले आहेत? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

कोर्टाने मनिष सिसोदियांना विपश्यना सेलमध्ये ठेवण्याची संमती दिली आहे. त्यांना तिथे न ठेवता क्रमांक एकच्या सेलमध्ये का ठेवण्यात आलं आहे? मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांची राजकीय हत्या भाजपाला घडवून आणायची आहे का? सौरभ भारद्वाज यांनी ही टीका केलीच त्यानंतर आपचे खासदार संजय सिंह यांनीही भाजपावर टीका केली.

संजय सिंह यांनी काय म्हटलं आहे?

ज्या मद्य धोरणाच्या अंतर्गत आणि घोटाळ्याच्या अंतर्गत मनिष सिसोदियांना तुरुंगात धाडण्यात आला आहे त्या कथित घोटाळ्याचे हात, पाय, धड, शीर काहीही नाही. तरीही मनिष सिसोदियांच्या घरी छापेमारी करण्यात आली. त्यांच्या गावात, त्यांच्या बँक खात्यांवर छापा मारण्यात आला. त्यामध्ये कुणालाही काहीही मिळालं नाही. दोन आरोपपत्रं दाखल केली गेली मात्र त्यात मनिष सिसोदियांचं नावही नव्हतं. आता मनिष सिसोदियांना अत्यंत क्रूर म्हणता येतील अशा कैद्यांसोबत ठेवलं गेलं आहे. तुरुंगात त्यांची हत्या घडवून आणायची हे भाजपाचं षडयंत्र आहे का? हा प्रश्न संजय सिंह यांनीही विचारला आहे.

पुढे संजय सिंह म्हणाले की कर्नाटकात भाजपाच्या आमदाराच्या घरी ८ कोटी रूपये सापडले. त्याच्या घरी कुठलीही ईडी किंवा सीबीआय गेली नाही. भाजपा आमदाराच्या मुलाला तातडीने जामीन मिळाला. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारायचं आहे की तुम्ही आणि तुमच्या पक्षात एवढा अहंकार आणि एवढा तिरस्कार का भरला आहे? असंही संजय सिंह यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aam aadmi party sanjay singh and saurabh bharadwaj targets pm modi and bjp over manish sisodia arrest in delhi liquor policy scam scj