दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने मोठा विजय संपादन केला आहे. मागील १५ वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या भाजपाला ‘आप’ने यावेळी जोरदार धक्का दिला. या विजयानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीचे भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी गायलेल्या प्रसिद्ध ‘रिंकीया के पापा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
‘रिंकीया के पापा’ या गाण्यावर डान्स करत आम आदमी पार्टीने भाजपा खासदार मनोज तिवारी यांना टोला लगावला आहे. ‘आप’चे कार्यकर्ते आणि समर्थकांनी गळ्यात फुलांचा हार आणि डोक्यावर ‘आप’ची टोपी घालून डान्स केला आहे. त्यांच्या पाठीमागे एका मोठ्या स्क्रीनवर भाजपा खासदार मनोज तिवारी यांच्या गाण्याचा व्हिडीओही लावला आहे. ज्यामध्ये मनोज तिवारी पडद्यावर गाताना दिसत आहेत, तर ‘आप’चे समर्थक नाचून जल्लोष करत आहेत.
या डान्सचा व्हिडीओ आम आदमी पार्टीच्या उत्तर प्रदेश युनिटने ट्वीट केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये ‘रिंकीया के पापा’ या गाण्याचे बोल लिहिले आहेत. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.
दिल्ली महापालिका निवडणुकीत कुणाला किती जागा?
आम आदमी पार्टीने दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत २५० पैकी १३४ जागा जिंकून भाजपाकडून सत्ता हिसकावून घेतली आहे. भाजपाला १०४ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला सुमारे ६४ जागा कमी मिळाल्या. दुसरीकडे, आम आदमी पार्टीला २०१७ च्या तुलनेत ९० जागा अधिक मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ ९ जागांवर विजय मिळवता आला आहे.