देशभरात पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी देशातील काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रासह राजस्थान, छत्तीसगड अशा राज्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली असून प्रचाराला आत्तापासूनच सुरुवात झाली आहे. एकीकडे देशातील १९ विरोधी पक्षांची नुकतीच भाजपाविरोधातील आघाडीसाठी पाटण्याला बैठक झाली असताना दुसरीकडे आपनं या सर्व घडामोडींपासून काहीसं अलिप्त धोरण स्वीकारलं आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्याच धोरण आपनं कायम ठेवलं आहे.
आम आदमी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आज एक ट्विटर करण्यात आलं आहे. यामध्ये “खोटं बोला, पुन्हा पुन्हा खोटं बोला”, असा मजकूर पोस्ट करण्यात आला आहे. या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका भाषणातला व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवरही “एवढं मोठं असत्य?” असं लिहिण्यात आलं आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील विकासाच्या मुद्द्यांविषयी भूमिका मांडताना या व्हिडिओत दिसत आहेत. हा व्हिडीओ नेमका कधीचा किंवा कुठला आहे? याविषयी ट्वीटमध्ये कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
“आज भारतात दर आठवड्याला एक नवीन विद्यापीठ उभं राहात आहे. तर तिसऱ्या दिवशी एक अटल टिंकरिंग लॅब उभी राहात आहे. तर दोन दिवसांत एक नवीन महाविद्यालय तयार होत आहे. दररोड एक नवीन आयटीआयची स्थापना होत आहे. भारतात दरवर्षी एक नवीन आयआयटी आणि आयआयएम तयार होत आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.
दरम्यान, हा व्हिडीओ आणि त्यातील दावे सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.