बॉलीवूड अभिनेता आमिर खान याची केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘अतुल्य भारत’ मोहिमेच्या सदिच्छादूत पदावरून गच्छंती झाल्यानंतर उठलेले वादळ अजूनही शमण्यास तयार नाही. प्रसिद्ध भोजपूरी गायक आणि दिल्लीतील भाजप खासदार मनोज तिवारी यांनी शुक्रवारी संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा वाद आता आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. ‘अतुल्य भारत’ मोहिमेच्या सदिच्छादूतपदी आमिर खानऐवजी अमिताभ बच्चन यांची नेमणूक का झाली, याबद्दलचे स्पष्टीकरण बैठकीदरम्यान स्थायी समितीच्या सदस्यांनी पर्यटन सचिवांना विचारले. तेव्हा मनोज तिवारींनी आमिर खानला देशद्रोही म्हणून संबोधल्याचे वृत्त आहे.
आमिर खान देशद्रोही आहे, त्याला बाहेर फेकायला हवे, असे तिवारी यावेळी म्हणाले. तिवारी यांच्या या विधानावर आक्षेप घेत समितीमधील सदस्यांनी यावेळी जोरदार विरोध दर्शविला. दरम्यान, याबद्दल तिवारी यांना विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले की, समितीच्या बैठकीत काय घडले हे गोपनीय असल्याने मी त्याबाबत काही बोलणार नाही. काँग्रेस आणि सीपीएमच्‍या खासदारांनी अामीरबाबत पर्यटन विभागाचे सचिव जुत्शी यांच्याकडे उत्‍तर मागितले. त्यावेळी हा मुद्दा बैठकीच्‍या उद्दिष्‍टात नसल्याचे जुत्शी यांनी सांगितले. मात्र, याबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये यावर उलट सुलट चर्चा होत आहे. त्‍यामुळे सचिवांना याचे उत्‍तर द्यावेच लागेल, असे सांगत राज्यसभेचे सदस्य के. डी. सिंह यांनी सचिवांना स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.
देशातले वातावरण बिघडल्याने आपल्या मुलांच्या सुरक्षित भवितव्यासाठी आपण देशाबाहेर जायचे का, असा प्रश्न पत्नी किरण रावने विचारल्याचे आमिरने दोन महिन्यांपूर्वी एका समारंभात जाहीरपणे सांगितले होते. त्यावरून समाजमाध्यमांतही जोरदार प्रतिक्रिया उमटली होती.

Story img Loader