दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवुली संचालनालयाने अटक केली आहे. २८ मार्चपर्यंत ते ईडी कोठडीत राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याने आपने निषेध नोंदवला आहे. केंद्र सरकारकडून सरकारी यंत्रणांचा गैरफायदा घेतला जात असल्याचं सांगून आपकडून विविध प्रकारचे निदर्शने सुरू आहेत. आज आपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घातला आहे. तर, दुसरीकडे भाजपाने अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
अरविंद केजरीवाल यांना गेल्या आठवड्यात मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात ईडीने अटक केली होती. नैतिकतेच्या आधारावर केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी भाजपची मागणी आहे. अरविंद केजरीवाल सध्या २८ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत.
पोलिस उपायुक्त देवेश कुमार महला म्हणाले, पीएम मोदींच्या निवासस्थानाभोवती अतिरिक्त सुरक्षा तैनात केली आहे. पोलिसांनी नवी दिल्ली परिसरात ५० पेट्रोलिंग वाहने देखील तैनात केली आहेत. तसंच, सर्व दिल्ली मेट्रो स्टेशनवर बोर्डिंग/डिबोर्डिंगवर कोणतेही बंधन नाही.
“कलम १४४ आधीच लागू करण्यात आले आहे. त्यामुळे येथे कोणालाही आंदोलन करण्याची परवानगी नाही. त्यामुळे आम्ही पुरेसा सुरक्षा कर्मचारी तैनात केला आहे. येथे आंदोलन करणाऱ्यांना आम्ही ताब्यात घेऊ”, असा इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान, काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पटेल चौक मेट्रो स्टेशनच्या बाहेर आपने निदर्शने केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हा परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले. येथे संचारबंदी लागू करण्यात आल्याचं सांगून, निदर्शनास परवानगी नाकारली आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
केजरीवालांच्या राजीनाम्यासाठी भाजपाकडून निदर्शने
दरम्यान, दिल्लीचे मुख्मयंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. त्यांनी नैतिकतेने राजीनामा द्यावा. त्यांनी त्यांची जबाबदारी कोणावर तरी सोपवावी. अरविंद केजरीवाल अजूनही आपल्या पदावर आहेत. याचा अर्थ ते स्वार्थी आहेत. असुरक्षिततेमुळे ते त्यांनी खुर्ची सोडत नाहीत, असं भाजपाचे खासदार हर्षवर्धन यांनी म्हटलंय. तर, अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाने दिल्लीत निदर्शनेही केली आहेत.
आप नेते दुर्गेश पाठक म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यामुळे दिल्लीतील जनता भाजपावर नाराज आहे. संपूर्ण दिल्ली आणि देशातील जनता संतप्त आहे आणि भाजपाविरोधात आपला राग व्यक्त करत आहे. देशाला पुढे नेण्याचं ध्येय असलेल्या अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकले आहे. मोदी अरविंद केजरीवाल यांचा द्वेष करतात, त्यांना घाबरतात.