दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनावर आता सर्व बाजूंनी टीका होत आहे. त्यात प्रख्यात लेखक चेतन भगत यांची भर पडली आहे. आम आदमी पक्ष म्हणजे राजकारणातील ‘आयटम गर्ल’ असून हिंदी चित्रपटांमध्ये जसे ‘आयटम गर्ल’ला जास्त भाव नसतो तसेच ‘आप’चेही होणार असल्याची टीका त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे चेतन भगत हे ‘आप’चे खंदे समर्थक आहेत.
दिल्ली पोलिसांविरोधात केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांनी थेट रस्त्यावरच धरणे आंदोलन करत दिल्लीकरांना वेठीस धरले होते. त्यांच्या या आंदोलनाचे फलित म्हणून दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले. परंतु त्यापलीकडे काही विशेष फरक पडला नाही. या पाश्र्वभूमीवर केजरीवाल यांनी केलेल्या आंदोलनाला आता त्यांच्या समर्थकांकडूनच टीकेला तोंड द्यावे लागत आहे. चेतन भगत यांनी ‘आप’च्या या आंदोलनाला चांगलेच फैलावर घेतले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केजरीवाल यांच्या या आंदोलनाला तमाशा संबोधत ‘आप’ म्हणजे राजकारणातील ‘आयटम गर्ल’ असल्याचे संबोधले. ‘आप’च्या या आंदोलनामुळे माझ्यासारख्या सर्वच पाठीराख्यांना लाज आणली. त्याचे समर्थन होऊच शकत नाही. त्यांच्या आंदोलनामुळे राजधानीतील व्यवहार ठप्प पडले, पोलिसांचे खच्चीकरण झाले, असे भगत म्हणाले.
दिल्लीतील यशामुळे हुरळलेल्या आम आदमी पक्षाला आता लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यांना त्यासाठी तयारी करायची आहे आणि म्हणूनच असली आंदोलने करून ते लोकांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेत आहेत. हे म्हणजे चित्रपटांतील आयटम गर्लसारखेच झाले. परंतु चित्रपटांतील आयटम गर्लना जसे भवितव्य नसते तसेच ‘आप’चेही होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader