पीटीआय, नवी दिल्ली
‘मोदी फॅक्टर’वर स्वार होऊन आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आम आदमी पक्षाला ‘लक्ष्य’ करत भाजपने दिल्लीतील सर्व सात जागांवर विजय मिळवला आणि दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीने उभे केलेले आव्हान परतवून लावले. दिल्लीत ‘आप’सह काँग्रेसलाही भोपळा मिळाला. दिल्लीत आप आणि काँग्रेसचा पराभव झाल्याने आघाडीच्या प्रयोगाच्या परिणामकारकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दक्षिण दिल्लीतून भाजपचे रामवीर सिंग बिधुरी विजयी झाले. त्यांनी ‘आप’च्या साही राम पहेलवान यांचा १,२४,३३३ मतांनी पराभव केला. बिधुरी हे दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. चांदनी चौक मतदारसंघातून भाजपच्या प्रवीण खंडेलवाल यांनी काँग्रेसच्या जे.पी. अग्रवाल यांचा ८९,३२५ मतांनी पराभव केला. नवी दिल्लीतून बांसुरी स्वराज यांनी आम आदमी पक्षाच्या सोमनाथ भारती यांचा ७८ जार ३७० मतांनी पराभव केला. पश्चिम दिल्लीतून कमलजीत सहरावत, उत्तर पश्चिम दिल्लीतून योगेंद्र चांदोलिया, पूर्व दिल्लीतून हर्ष मल्होत्रा, तर उत्तर पूर्व दिल्लीतून मनोज तिवारी विजयी झाले. तिवारी यांनी काँग्रेसच्या कन्हैया कुमार यांचा पराभव केला.
हेही वाचा >>>राज्यघटना आमचा दीपस्तंभ! विकसित भारतासाठी सर्वाबरोबर काम करण्याचे मोदींचे आश्वासन
२०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा सर्व सातही मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांचे विजयी मताधिक्य कमी झाले आहे. काँग्रेस आणि आपच्या उमेदवारांनी चांदनी चौक आणि नवी दिल्ली मतदारसंघात मात्र कडवी झुंज दिली.
पक्षनिहाय मतांची टक्केवारी
वर्ष २०२४ २०१९ २०१४
भाजप ५४ ५६.७ ४६.६
आप २४ १८.२ ३३.१
काँग्रेस १८ २२.६ १५.२