भाजपाकडून तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्ष करत आहेत. तपास यंत्रणांची भीती दाखवून भ्रष्टाचाऱ्यांना भाजपात प्रवेश दिला जात असल्याचाही दावा केला जात आहे. आत्तापर्यंत इतर पक्षांमधून भाजपात गेलेल्या अनेक बड्या नेत्यांचाही दाखला यासाठी दिला जात आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या प्रकरणातही आम आदमी पक्षाकडून अशाच प्रकारचा आरोप केला जात असताना आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा मुद्दा थेट दिल्लीच्या संसदेत उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सर्व भ्रष्टाचारी एकाच पक्षात”

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडी-सीबाआयच्या धाडींबाबत भाजपावर टीकास्र सोडलं. “ईडी आणि सीबीआयनं देशातल्या सर्व भ्रष्टाचाऱ्यांना एका व्यासपीठावर एकत्र नाही आणलं, तर एका पक्षात एकत्र करून टाकलं. ईडी-सीबीआयवाले छापा टाकतात आणि कानावर बंदूक ठेवून म्हणतात सांगा तुरुंगात जायचंय की भाजपात जायचंय? मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्याही कानावर बंदूक ठेवली आणि विचारलं सांगा, जेलमध्ये जायचंय की भाजपात. ते म्हणाले की जेलमध्ये जायचंय. आम्ही मरण पत्करू पण भाजपात जाणार नाही”, असं केजरीवाल म्हणाले.

“…म्हणून हेमंत बिस्व शर्मा भाजपात गेले”

“हेमंत बिस्व शर्मांना डोक्यावर बंदूक ठेवून विचारलं तर ते म्हणाले भाजपात जायचंय. कारण त्यांनी चोरी केली आहे. मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांनी चोरी केलेली नाही. त्यामुळे त्यांना माहिती आहे की फारतर ६-७ महिने आत ठेवतील आणि नंतर बाहेर यायचंच आहे. काही केलंच नाही तर काय होणार आहे? जामीन मिळणारच आहे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा मिळेल”, असं केजरीवाल यावेळी म्हणाले.

केजरीवालांनी केला नारायण राणेंचा उल्लेख

दरम्यान, यावेळी ईडी-सीबीआयच्या भीतीपोटी भाजपात गेलेल्या नेत्यांच्या यादीत केजरीवाल यांनी नारायण राणेंचंही नाव घेतलं. “नारायण राणेंच्या कानावर बंदूक ठेवली आणि विचारलं तर ते म्हणाले भाजपामध्ये जायचंय. सुवेंदू अधिकारी मुकुल रॉय यांच्या कानावरही अशीच बंदूक ठेवून विचारलं. घोटाळे केले होते त्यांनी. देशातले जेवढे चोर, भ्रष्टाचारी आहेत ते सगळे एकाच पक्षात आहेत. भाजपामध्ये”, असा टोला केजरीवाल यांनी लगावला.

“…आणि देश भ्रष्टाचारमुक्त होईल”

“वेळ सारखी राहात नाही. वेळ बदलत असते. आज त्यांचं सरकार आहे, मोदी पंतप्रधान आहेत. कधी ना कधी ते पायउतार होतीलच ना. त्या वेळी भ्रष्टाचारमुक्त भारत होईल. कसा? जेवढे चोर आहेत, ते सगळे एकाच खोलीत आहेत. त्यांना पकडणं फार सोपं असेल. फार कष्ट पडणार नाही. सगळ्या देशातल्या लुटारूंना ईडी-सीबीआयची भीती दाखवून यांनी त्यांच्या पक्षात एकत्र करून ठेवलं आहे. ज्या दिवशी भाजपा सत्तेतून बाहेर होईल, मोदी पंतप्रधान असणार नाहीत तेव्हा भाजपावाल्यांना तुरुंगात टाका. देश भ्रष्टाचारमुक्त होऊन जाईल”, असंही केजरीवाल यावेळी म्हणाले.