सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तास्थापनेपासून वंचित राहिलेल्या भाजपने दिल्ली विधानसभेत प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका वठविण्याचा निर्धार केला आहे. त्याची सुरुवात सोमवारपासूनच झाली. काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करणाऱ्या आम आदमी पक्षाने दिल्लीकरांचा विश्वासघात केल्याची जोरदार टीका भाजपचे सभागृह नेते डॉ. हर्षवर्धन यांनी केली. मावळत्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी मात्र केजरीवाल यांना कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
हर्षवर्धन म्हणाले की, भ्रष्टाचाराविरोधात लढण्याच्या बाता मारणाऱ्यांनी कुणासोबत सत्ता स्थापनेसाठी भ्रष्ट काँग्रेसशी युती केली हे दिल्लीकर कधीही विसरणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत दिल्लीकरांनी भ्रष्ट काँग्रेसला नाकारले, परंतु त्यांच्याशीच ‘हात’मिळवणी करीत केजरीवाल यांनी मतदारांचा विश्वासघात केला. मतदारांना दिलेली आश्वासने आम आदमी पक्ष कसा पूर्ण करतो, हे पाहणे रंजक ठरेल. ‘काँग्रेस का हाथ ‘आम’ आदमी के साथ’, या घोषणेची प्रचीती उभय पक्षांच्या आघाडीमुळे आली, अशी मार्मिक टिप्पणी हर्षवर्धन यांनी केली. दरम्यान, काँग्रेसच्या पाठिंब्यावर आम आदमी पक्षाचे नेते प्रशांत भूषण यांनी संशय व्यक्त केला. ते म्हणाले की, काँग्रेसचा इतिहास पाहता आमचे सरकार फार काळ टिकणार नाही. एक महिना, तीन महिने वा सहा महिनेही सरकार चालू शकते. सरकारच्या स्थिरतेबाबत आत्ता काहीही सांगता येणार नाही. ‘अतिमहत्त्वाचे व्यक्ती’ ही संकल्पना बाद ठरवून खऱ्या अर्थाने सामान्यांच्या प्रश्नावर आमचे सरकार काम करेल, असा विश्वास भूषण यांनी व्यक्त केला. काँग्रेसनेदेखील सावध भूमिका घेतली आहे. नूतन प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली म्हणाले की, जनतेच्या हिताचे निर्णय जोपर्यंत सरकार घेत राहील, तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहोत. जनतेच्या हिताचे म्हणजे कोणते निर्णय, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे मात्र त्यांनी टाळले. काँग्रेसशी ‘हात’मिळवणी केली असली तरी ‘आप’च्या काँग्रेसविरोधी घोषणा कायम आहेत. कॉन्स्टिटय़ुशन क्लबमध्ये जमलेले केजरीवाल समर्थक काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करीत होते. ‘झाडू चली-काँग्रेस हिली’, ‘शीला हटाओ-केजरीवाल लाओ’, ‘झाडू चलाओ- भ्रष्टाचार मिटाओ’, अशा घोषणा दिल्या जात होत्या. ‘आसाराम-मोदीराम-माफिया को छोड दो’, या घोषणांमधून कार्यकर्ते भाजप व प्रसारमाध्यमांविरुद्ध रोष प्रकट करीत होते.