Delhi Exit Poll : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान संपल्यानंतर सायंकाळी विविध संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. यातील बहुतांश एक्झिट पोलनुसार, २७ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भाजपा दिल्लीत सरकार स्थापन करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे असले तरी आम आदमी पक्षाचे अनेक नेते दिल्लीत आम आदमी पक्षाचीच सत्ता येईल असे म्हणत आहेत. दिल्ली विधानसभेत एकूण ७० जागा आहेत आणि बहुमताचा आकडा ३६ इतका आहे.
दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर आम आदमी पक्षाने दरवेळीप्रमाणे यंदाही एक्झिट पोल खोटे ठरतील असा दावा केला आहे. एक्झिट पोलबाबत बोलताना आप नेते सुशील गुप्ता म्हणाले, “ही आमची चौथी निवडणूक आहे आणि प्रत्येक वेळी एक्झिट पोलमध्ये दिल्लीत आप सरकार स्थापन करणार नाही असे दाखवतात. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या लोकांसाठी काम केले आहे. निकालाच्या दिवशी आपल्याला हा निकाल आम आदमी पक्षाच्या बाजूने लागल्याचे दिसेल. दिल्लीत आम्हीच सत्ता स्थापन करणार आहोत.”
एक्झिट पोलवर बोलताना ‘आप’च्या नेत्या रीना गुप्ता म्हणाल्या, “दिल्लीची ही चौथी निवडणूक आहे ज्यामध्ये मी सहभागी झाली आहे. २०१३ असो वा २०१५ दोन्ही एक्झिट पोलमध्ये ‘आप’ला कमी जागा मिळणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले होते. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर ‘आप’ला सर्वाधिक जागा मिळाल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. यावेळी अरविंद केजरीवाल ऐतिहासिक जागा जिंकणार आहेत. दिल्लीचे लोक अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा बनवणार आहेत.”
गेल्या तीन निवडणुकांमध्ये ‘आप’ ची कामगिरी
आम आदमी पक्षाने २०१३ मध्ये पहिल्यांदा दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामध्ये भाजपाने सर्वाधिक ३२, आम आदमी पक्षाने २८ आणि काँग्रेसने ८ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसने बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर अरविंद केजरीवाल पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत, ‘आप’ने ७० पैकी एकूण ६७ जागा जिंकून सर्वात मोठा विजय मिळवला होता. यामध्ये भाजपाला फक्त तीन जागा तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता.
पुढे २०२० च्या विधानसभा निवडणुकीतही आम आदमी पक्षाने प्रभावी कामगिरी केली होती. यामध्ये त्यांनी ६२ जागा जिंकत सत्ता राखली होती. यामध्ये भाजपाने आठ जागा जिंकून आपले संख्याबळ वाढवले होते, तर काँग्रेस पक्ष दुसऱ्यांदा शून्य जागांवर अडकला होता.