नवी दिल्ली : दिल्लीकरांनी सलग दोन वेळा केंद्रात भाजपला आणि राज्यात आम आदमी पक्षाला (आप) कौल दिला होता. २०१४ च्या परिवर्तनाच्या लाटेत दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघांमध्ये कमळ फुलले होते. २०१९ मध्ये दिल्लीकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बघून मतदान केले होते. त्यामुळे २०२४ मध्येही भाजपला दिल्लीकरांकडून हॅट्ट्रिकची अपेक्षा आहे. या वेळी ‘आप’ व काँग्रेसने आघाडी केली असून भाजपची ५० टक्क्यांहून जास्त मतांची हिस्सेदारी मोडून काढण्याचे मोठे आव्हान ‘इंडिया’समोर असेल.

भाजपने दिल्लीतील ६ विद्यामान खासदारांना डच्चू दिला आहे. दक्षिण दिल्लीतील रमेश बिधुरी, पश्चिम दिल्लीतील परवेश वर्मा यांना वाचाळपणाची किंमत चुकवावी लागली. नवी दिल्लीतील मीनाक्षी लेखी, चांदनी चौकातील हर्षवर्धन आणि पूर्व दिल्लीतील गौतम गंभीर या तीन अकार्यक्षम खासदारांनाही बाजूला केले. उत्तर पश्चिम दिल्लीतील हंसराज हंस यांना पंजाबातील … मतदारसंघात पाठवले गेले. फक्त उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये विद्यामान खासदार मनोज तिवारी यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली गेली. उत्तर-पूर्वमध्ये पूर्वांचल मतदारांची मोठी संख्या असून तिवारी प्रचंड लोकप्रिय आहेत. मुस्लिमांची संख्या २३ टक्के असून ‘एनआरसी’च्या मुद्द्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. २०२० मध्ये याच भागांत दंगल झाली होती. त्यामुळे ध्रुवीकरणाचा लाभ मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न राहील. अन्य मतदारसंघांमध्ये सामाजिक व जातीय समीकरणांनुसार नवे चेहरे देऊन मतांचा टक्का घसरणार नाही याची दक्षता भाजपने घेतल्याचे दिसते. पण, गुर्जरबहुल दक्षिण दिल्लीमध्ये भाजप व ‘आप’नेही गुर्जर उमेदवार दिले आहेत. गेल्या वेळी पंजाबी राघव चड्ढांना उभे करण्याची चूक दुरुस्त केल्यामुळे इथे लढाई रंगतदार होऊ शकेल. नवी दिल्लीतून सुषमा स्वराज यांची कन्या बन्सुरी स्वराज भाजपच्या उमेदवार असून त्यांच्याविरोधात ‘आप’चे नेते सोमनाथ भारती रिंगणात उतरले आहेत. ही लढतदेखील लक्षवेधी ठरू शकेल. पश्चिम दिल्लीमध्ये भाजपने जाट महिला उमेदवार कमलजीत सेहरावत यांना उभे केले असून ‘आप’ने अनुभवी महाबळ मिश्रांना तिकीट दिले आहे. हा पूर्वांचल, शीख, जाट असा संमिश्र मतदारसंघ आहे.

हेही वाचा >>>“कोणतेही नियम पाळले जाणार नाहीत, संधी मिळताच…”, दहशतवादावर एस. जयशंकर यांची ठाम भूमिका

पूर्व दिल्लीमध्ये १६ टक्के अनुसूचित जाती व १५ टक्के मुस्लीम असून या खुल्या गटातील मतदारसंघातून ‘आप’ने दलित समाजातील कुलदीप कुमार यांना उमेदवारी देऊन भाजपला आव्हान दिले आहे. उत्तर-पश्चिम मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. या मतदारसंघासह चांदनी चौक व उत्तर-पूर्व अशा तीन जागा काँग्रेस लढवणार आहे.

केजरीवालांच्या अटकेची सहानुभूती?

मद्याविक्री घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक हा लोकसभा निवडणुकीचा मुद्दा बनवला असून दिल्लीकरांच्या सहानुभूतीचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न ‘आप’ करत आहे. केजरीवालांच्या पत्नी सुनीता व इतर ‘आप’च्या नेत्यांकडून मतदारांना भावनिक आवाहन केले जात असून घरोघरी जाऊन ‘आप’चे कार्यकर्ते प्रचार करू लागले आहेत. भाजपने मात्र भ्रष्टाचारविरोधाच्या मुद्द्याभोवती प्रचार केंद्रित केला आहे. केजरीवाल कधीकाळी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे प्रमुख नेते होते, ते आता भ्रष्टाचाराचा चेहरा बनल्याचा आरोप करून भाजपने केजरीवाल व ‘आप’च्या स्वच्छ चारित्र्याच्या प्रतिमेला भेदण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत तगड्या नेतृत्वाविना ‘आप’ किती टिकाव धरेल यावरही दिल्लीतील भाजप विरुद्ध ‘इंडिया’ची लढाई किती निकराची होईल हे ठरेल.

हेही वाचा >>>‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या

२०२४ मध्ये भाजपला दिल्लीकरांकडून हॅट्ट्रिकची अपेक्षा आहे. या वेळी ‘आप’ व काँग्रेसने आघाडी केली आहे. भाजपची ५० टक्क्यांहून जास्त मतांची हिस्सेदारी मोडून काढण्याचे आव्हान ‘इंडिया’समोर असेल.

मताधिक्य कसे मोडणार?

२०१९मध्ये दिल्लीतील सात जागांवर मिळून भाजपला ५६.९ टक्के, काँग्रेसला २२.५ टक्के तर, ‘आप’ला १८.१ टक्के मते मिळाली होती. काँग्रेस व ‘आप’ची एकत्रित मतांची टक्केवारीदेखील ४०.६ टक्के होते. २०१९ मध्ये दक्षिण दिल्लीत भाजपच्या रमेश बिधुरींचे मताधिक्य ३० टक्क्यांपेक्षाही जास्त होते. हा मतांच्या टक्केवारीतील फरक मोडून काढल्याशिवाय आप-काँग्रेसला भाजपवर मात करता येणार नाही. हे मतांचे गणित लक्षात घेऊन भाजपने केजरीवालांना अटक करण्याची राजकीय खेळी केल्याचे मानले जात आहे.

एकूण जागा : ७ ● २०१९ चे बलाबल ● भाजप ७

Story img Loader