अग्निपथ योजना आणखी एका वादाच्या भोरवऱ्यात सापडली आहे. या योजनेमार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठीच्या अर्जावर जात आणि धर्म विचारल्या जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांना ‘अग्निवीर’ तयार करायचे आहेत की ‘जातीवीर’, असा प्रश्न आप नेता संजय सिंग यांनी विचारला आहे. तर राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) नेही यारून भापजावार टीका केली आहे.

आपची केंद्र सरकारवर टीका

आप नेता संजय सिंग यांनी ट्वीट करत केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ”मोदी सरकारचा खरा चेहरा देशासमोर आला आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी हे दलित, मागास, आदिवासींना सैन्य भरतीसाठी पात्र मानत नाहीत का? भारताच्या इतिहासात प्रथमच ‘सैन्य भरती’मध्ये जात विचारली जात आहे. मोदीजी तुम्हाला ‘अग्निवीर’ बनवायचे आहेत की ‘जातीवीर”’, असे ट्वीट संजय सिंग यांनी केले आहे.

भाजपाने फेटाळून लावले आरोप

दरम्यान, या आरोपांवर भाजपानेही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी हे आरोप फेटाळून लावत, भरती प्रक्रियेत कोणताही बदल झाला नसल्याचे म्हटले आहे. तसेच २०१३ मध्ये, भारतीय लष्कराने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानुसार सैन्य निवड प्रक्रियेत कोणाच्याही जातीचा विचार केल्या जात नाही, असे सैन्यदलांकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, अर्जात जातीसाठी एक जागा ठेवण्यात आली आहे. त्यााचा वापर केवळ प्रशासकीय कामासाठी करण्यात येतो, असे संबित पात्रा यांच्याकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला देणाऱ्या रामदास कदमांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; म्हणाले “ही माणसं कधीच…”

सैन्याकडून स्पष्टीकरण

या वादावर भारतीय सैन्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. भरती प्रक्रियेत कोणताही बदल करण्यात आला नाही, असे सैन्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच भरती प्रकियेदरम्यान, अर्जावर वापरण्यात येणारा धर्माचा रखाना हा पुर्वीपासूनच आहे, असे सांगण्यात आले आहे. सेवा बजावताना कोणालाही वीरमरण आल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी धर्म विचारल्या जातो, असेही सैन्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.