शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता शिंदे गटाकडे जाणाऱ्या आमदार-खासदारांची संख्या वाढू लागली आहे. शिवसेनेच्या अनेक खासदारांनी देखील शिंदे गटाची वाट धरल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून या सगळ्यासाठी भाजपाला जबाबदार धरलं जात असून भाजपानंच शिवसेनेत फूट पाडल्याचा आरोप केला जात आहे. महाराष्ट्रात हे सगळं होत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर टीका केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. खुद्द आम आदमी पक्षाकडून हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ दिल्लीच्या विधानसभेतला असल्याचं दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत भाषणावेळी केलेली विधानं या व्हिडीओमध्ये आहेत. मात्र, नेमका हा व्हिडीओ कधीचा आहे, यासंदर्भात खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही.

एकनाथ शिंदेंना आमदारांनंतर खासदारांचाही पाठिंबा? दिल्लीतील त्या भेटीमुळे चर्चांना उधाण; संध्याकाळी मोदी-शिंदे भेटीची शक्यता

“आप’ला भाजपाचे टॉपचे दोन नेते घाबरतात”

फक्त आम आदमी पार्टीलाच भाजपाचे दोन टॉपचे नेते घाबरतात, असा खोचक टोला यावेळी अरविंद केजरीवाल यांनी लगावला आहे. “आज पूर्ण देशात एकेक करून सगळे पक्ष फुटत चालले आहेत. झुकत चालले आहेत. शरण येत आहेत. यांनी सगळ्यांना तोडलं. पण आज सगळा देश आम आदमी पार्टीकडे पाहात आहे. फक्त आम आदमी पक्षामुळे यांची पँट ओली होते. फक्त आम आदमी पक्षालाच भाजपाचे टॉपचे दोन नेते घाबरतात”, असं केजरीवाल या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

महाराष्ट्रात काय घडतंय?

महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ आपकडून व्हायरल केला जात असल्यामुळे त्यावरून तर्क-वितर्क काढले जात आहेत. शिवसेनेत पडलेली उभी फूट, उद्धव ठाकरेंनी दिलेला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, महाविकास आघाडीचं सरकार कोसळणं, त्यापाठोपाठ शिंदे गट आणि भाजपा युतीचं सरकार, एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांचा उपमुख्यमंत्रीपदासाठी शपथविधी या सगळ्या घडामोडी फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी भाजपाच असल्याचा तर्क लावला जात आहे.

Story img Loader