दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असताना ईडीला असे आढळून आले आहे की गोवा विधानसभा निवडणुकीत पैसे पाठवण्यासाठी मुंबईतील हवाला ऑपरेटरची मदत घेतली गेली होती. ईडीने दाखल केलेल्या रिमांड अर्जात हा आरोप केला आहे. फ्री प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
ईडीच्या म्हणण्यानुसार, दिल्ली दारू घोटाळ्यात निर्माण झालेल्या गुन्ह्यातील कमाईचा मोठा फायदा आम आदमी पार्टीला (आप) झाला. २०२१-२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या प्रचारात १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील सुमारे ४५ कोटी रुपये वापरण्यात आल्याचे आढळून आले. हा पैसा दक्षिण गटाकडून मिळालेल्या लाचेतून आला होता. ज्यात दिल्लीच्या मद्य बाजारात रस असलेल्या के कविता (तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी), मागुंता एस रेड्डी, राघव मागुंटा आणि सरथ रेड्डी यासारख्या प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे.
ईडीच्या रिमांड अर्जानुसार, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे विश्वासू सहकारी दिनेश अरोरा यांनी १ ऑक्टोबर २०२२ रोजी ईडीला दिलेल्या निवेदनादरम्यान खुलासा केला की, त्याने ३१ कोटींची लाच ट्रान्सफर केली. हे हस्तांतरण अभिषेक बोईनपल्ली, राजेश जोशी आणि सुधीर नावाच्या व्यक्तीच्या सहकार्याने करण्यात आले. केजरीवाल यांचे प्रमुख सहकारी विजय नायर यांच्या सूचनेनुसार ही कार्यवाही करण्यात आली होती. विजय नायर यांच्यावर दक्षिण समूहाकडून एकूण १०० कोटी रुपये लाच घेतल्याचा आरोप आहे. बोईनपल्ली हे दक्षिण समूहाच्या प्रमुख प्रतिनिधींपैकी एक आहेत आणि सुधीर हा विजय नायरचा जवळचा सहकारी आहे.
ईडीच्या म्हणण्यानुसार, आपने गोव्यातील निवडणूक प्रचारासाठी राजेश जोशी यांच्या मालकीच्या मेसर्स रथ प्रोडक्शन मीडिया प्रायव्हेट लिमिटेडची मदत घेतली होती. ED ने मेसर्स रथ प्रॉडक्शनच्या विक्रेत्यांचीही तपासणी केली. ईडीने दावा केला की अनेक विक्रेत्यांना मेसर्स रथ प्रॉडक्शनने ‘पार्ट कॅश पार्ट बिल’ पेमेंट केले होते. असाच एक विक्रेता ग्रेस ॲडव्हर्टायझिंग आहे. ज्याचा कर्मचारी इस्लाम काझी याने ईडीला खुलासा केला आहे, की त्याने केवळ काही रकमेसाठी बीजक उभारले आणि उर्वरित रक्कम त्याला रोख स्वरूपात दिली गेली.