आम आदमी पक्षाच्या (आप) कौशंबी येथील मुख्यालयावर हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी  हल्ला केला. त्यात त्यांनी विटा व दगडांचा वापर केला. काश्मीरमध्ये जनमत घेण्यात यावे असे वक्तव्य आम आदमी पक्षाचे नेते प्रशांत भूषण यांनी केले होते. त्याच्या निषेधार्थ हा हल्ला करण्यात आला. हिंदू रक्षा दलाच्या चाळीस कार्यकर्त्यांनी आपच्या कार्यालयात घुसून फुलदाण्या तोडल्या. तसेच काही पोस्टर्सही फाडली. काहींनी काचेचे दरवाजे तोडले.आपचे प्रवक्ते दिलीप पांडे यांनी सांगितले की, हिंदू रक्षा दलाच्या काही युवकांनी पक्षाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करून आपच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांनी पक्षाच्या कार्यालयातील फुलदाण्या तोडल्या. वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, पक्षाच्या कार्यालयात सुरक्षा नव्हती पण आता तेथे पोलीस तैनात केले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानीही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. केजरीवाल यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे त्यामुळे त्यांना सुरक्षा स्वीकारण्याबाबत राजी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. गाझियाबाद व दिल्ली पोलिसांनी त्यांना सुरक्षा देऊ केली आहे. प्रशांत भूषण यांनी अलीकडेच असे वक्तव्य केले होते की, काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी लष्कर दाखल करावे किंवा नाही यावर जनमत घेण्यात यावे. दरम्यान आम आदमी पक्षाने त्यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला दूर ठेवले आहे.

भाजपनेच आजचा हल्ला घडवला असा आरोप आपचे नेते कुमार विश्वास यांनी केला, ते म्हणाले की, भाजपला लोकसभेतही अशाच स्थितीला सामोरे जावे लागेल अशी भीती वाटते, श्रीराम सेनेने हा हल्ला केल्याचे बोलले जात असले तरी ते भाजपच्या उजव्या गटांचेच कृत्य आहे. प्रशांत भूषण यांनी काश्मीर विषयी केलेले वक्तव्य व्यक्तीगत आहे, ते पक्षाचे मत नाही असा खुलासाही त्यांनी केला.

हल्लाप्रकरणी १२ जणांना अटक
या हल्लाप्रकरणी हिंदू रक्षा समितीचा राष्ट्रीय संयोजक पिंकी चौधरी याच्यासह १२ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी चौधरीसह ३० ते ४० अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक रनविजय सिंह यांनी सांगितले. कार्यालयातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलीस तपासत आहेत.

हेतूविषयी शंका
एखाद्या विषयावर मत मांडून त्याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतरही हा हल्ला होतो, त्यामुळे प्रशांत भूषण किंवा आपल्याला मारण्याचा कट तर हल्लेखोरांचा नव्हता ना, अशी शंका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केली आहे. पक्षाने प्रशांत भूषण यांच्या काश्मीरबाबतच्या वक्तव्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतरही हा हल्ला होता याबाबत केजरीवाल यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असल्याचे स्पष्ट करीत देशापासून तो कोणी तोडू शकणार नाही, असे केजरीवाल यांनी सांगितले.

 

Story img Loader