आम आदमी पक्षाच्या (आप) कौशंबी येथील मुख्यालयावर हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी हल्ला केला. त्यात त्यांनी विटा व दगडांचा वापर केला. काश्मीरमध्ये जनमत घेण्यात यावे असे वक्तव्य आम आदमी पक्षाचे नेते प्रशांत भूषण यांनी केले होते. त्याच्या निषेधार्थ हा हल्ला करण्यात आला. हिंदू रक्षा दलाच्या चाळीस कार्यकर्त्यांनी आपच्या कार्यालयात घुसून फुलदाण्या तोडल्या. तसेच काही पोस्टर्सही फाडली. काहींनी काचेचे दरवाजे तोडले.आपचे प्रवक्ते दिलीप पांडे यांनी सांगितले की, हिंदू रक्षा दलाच्या काही युवकांनी पक्षाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करून आपच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांनी पक्षाच्या कार्यालयातील फुलदाण्या तोडल्या. वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, पक्षाच्या कार्यालयात सुरक्षा नव्हती पण आता तेथे पोलीस तैनात केले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानीही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. केजरीवाल यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे त्यामुळे त्यांना सुरक्षा स्वीकारण्याबाबत राजी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. गाझियाबाद व दिल्ली पोलिसांनी त्यांना सुरक्षा देऊ केली आहे. प्रशांत भूषण यांनी अलीकडेच असे वक्तव्य केले होते की, काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी लष्कर दाखल करावे किंवा नाही यावर जनमत घेण्यात यावे. दरम्यान आम आदमी पक्षाने त्यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला दूर ठेवले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा