पीटीआय, नवी दिल्ली
करोना प्रतिबंधासाठी केंद्राने अनिवार्य मार्गदर्शक तत्त्वे-नियमावली लागू केली पाहिजे. प्रत्येकाने मग तो राजकीय पक्ष असो किंवा यात्रा काढणारा, अशा सर्वानी त्यांचे पालन केले पाहिजे, असा सल्ला आम आदमी पक्षाने शनिवारी दिला. नवी दिल्लीत शनिवारी पोहोचलेल्या काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा अप्रत्यक्ष संदर्भ देऊन ‘आप’ने ही मागणी केली.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींना भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचे आवाहन करणारे पत्र पाठवले होते, यावर‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा यांना ‘आप’ची भूमिका पत्रकार परिषदेत विचारली गेली. त्यावर बोलताना चढ्ढा म्हणाले, की २०२० व २०२१ मध्ये महासाथीच्या पहिल्या व दुसर्या लाटेदरम्यान देशाने अनुभवलेली परिस्थिती टाळण्यासाठी केंद्राने मार्गदर्शक तत्त्वे लागू करून त्यांचे पालन अनिवार्य केले पाहिजे. या महासाथीच्या लाटांच्या मोठय़ा संकटाला आपण तोंड दिले.