AAP vs Congress In Delhi : दिल्लीत येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. अशात आम आदमी पक्षाने काँग्रेसची डोकेदुखी वाढवली आहे. जर काँग्रेसने दिल्ली काँग्रेसचे नेते अजय माकन यांच्यावर कारवाई नाही केली तर, ते काँग्रेसला इंडिया आघाडीतून काढून टाकण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी, काँग्रेस विधानसभा निवडणुकीसाठी भाजापाला मदत करत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, “दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला फायदा व्हावा यासाठी काँग्रेस त्यांना मदत करत आहे. अजय माकन भाजपाची स्क्रिप्ट वाचत असतात, ते भाजपाच्या इशाऱ्यावर विधाने करतात आणि भाजपाच्या सूचनेनुसार आप नेत्यांना लक्ष्य करतात. काल त्यांनी सर्व मर्यादा ओलांडत आमचे नेते अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही म्हटले.”

२४ तासांची मुदत

या सर्व प्रकरणावर बोलताना आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले, “त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अजय माकन यांच्यावर काँग्रेसने २४ तासांच्या आत कारवाई करावी अन्यथा आम्ही इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी संपर्क साधू आणि काँग्रेसला आघाडीतून काढून टाकण्याची मागणी करू.”

काँग्रेस उमेदवारांना भाजपाकडून निधी

काँग्रेसला लक्ष्य करत मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या, “काँग्रेसच्या कृती आणि शब्दांवरून हे स्पष्ट होते की, त्यांनी दिल्ली निवडणुकीसाठी भाजपाबरोबर “टायअप” केले आहे. काँग्रेसने कधी भाजपाविरोधात पोलिसात तक्रार केली आहे का? नाही. पण ते ‘आप’च्या नेत्यांविरुद्ध करत आहेत.”

मुख्यमंत्री आतिशी पुढे म्हणाल्या की, “आज काँग्रेस अरविंद केजरीवाल यांच्यावर देशद्रोही असल्याचा आरोप करत आहे. काँग्रेसने काल माझ्या आणि अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेसने भाजपाच्या कोणत्याही नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे का? काँग्रेसच्या उमेदवारांचा निवडणूक खर्च भाजपाकडून होत असल्याचे आम्हाला सूत्रांकडून समजले आहे. भाजपाचा काँग्रेसच्या उमेदवारांना निधी देत ​​आहे.”

हे वाचा >> ‘भाजपा आमदाराने विधानसभेत बलात्कार केला, हनीट्रॅपसाठी दबाव टाकला’, पीडितेचा धक्कादायक आरोप, न्यायालयानं सुनावली कोठडी

फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका

दिल्लीत फेब्रुवारी २०२५ मध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. असे असले तरी केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. सलग १५ वर्षे दिल्लीत सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने ६२ जागा तर भाजपाने ८ जागा जिंकल्या होत्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap launches a scathing attack on congress threatening to remove them from the india bloc aam