दोन दिवसांपूर्वी पंजाबच्या लुधियानाती स्थानिक आप नेता अनोख मित्तल आणि त्याची पत्नी मानवी उर्फ लिप्सी यांच्यावर दरोडेखोरांनी हल्ला केल्याचं वृत्त समोर आलं होतं. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पत्नी लिप्सीचा मृत्यू झाल्याचा कांगावा या अनोख मित्तलनं केला होता. मात्र, आता अनोखनंच पत्नी लिप्सीची हत्या करण्यासाठी या हल्लेखोरांना पैसे दिले होते, असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. लुधियाना पोलिसांनी केलेल्या तपासात ही बाब उघड झाली असून या प्रकरणात पोलिसांनी अनोख मित्तलसह तीन हल्लेखोरांना अटक केली असून चौथ्याचा शोध चालू आहे.

नेमकं काय घडलं होतं?

१४ फेब्रुवारी रोजी रात्री अनोख मित्तल व त्याची पत्नी लिप्सी यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला. यावेळी पत्नीवर तलवारीने वार केले. अनोखला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं आणि त्यांच्याकडीली दागिने व त्यांची कार घेऊन हल्लेखोर पसार झाले. या दोघांना रुग्णालयात दाखल केलं असता लिप्सीचा मृत्यू झाला, तर अनोखवर उपचार करण्यात आले. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव अनोखनं पोलिसांसमोर केला. पण खरा प्रकार नंतर उघड झाला.

लुधियानाचे पोलीस आयुक्त कुलदीप सिंग चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान अनोख मित्तलनंच त्याची प्रेयसी प्रतिक्षाच्या मदतीने लिप्सीच्या हत्येसाठी हल्लेखोरांना पैसे दिल्याचं समोर आलं आहे. “पाच हल्लेखोरांना मित्तलनं पैसे दिले होते. मित्तल पत्नीसोबत जेवायला बाहेर गेला होता. तिथून परत येत असताना डेहलन रस्त्यावर या हल्लेखोरांनी मित्तलची गाडी अडवली. मानवी उर्फ लिप्सीवर तलवारीने वार केले. नंतर तिथून दागिने आणि मित्तलची कार घेऊन हल्लेखोरांनी पळ काढला, जेणेकरून ही हत्या नसून दरोडा वाटावा”, अशी माहिती चहल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

हत्येच्या सुपारीसाठी दिले अडीच लाख रुपये!

अनोख मित्तलनं पत्नी मानवीच्या हत्येसाठी हल्लेखोरांना अडीच लाख रुपये दिल्याचंही तपासात समोर आल्याबाबत चहल यांनी माहिती दिली. ५० हजार रुपये आगाऊ रक्कम हल्लेखोरांना देण्यात आली होती, तर उरलेली रक्कम हत्येनंतर दिली जाणार होती, असं ते म्हणाले. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत अनोख मित्तल याच्यासह अमृतपाल सिंग उर्फ बल्ली (२६), गुरदीप सिंग (२५), सोनू (२४) आणि सागरदीप उर्फ तेजी (३०) या चौघांना अटक केली आहे. त्याशिवाय गुरप्रीत सिंग उर्फ गोपी हा आरोपी अद्याप फरार आहे.

लिप्सीला विवाहबाह्य संबंधांचा लागला होता सुगावा!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोख मित्तरचे प्रतिक्षाशी विवाहबाह्य संबंध होते. यासंदर्भात मानवी उर्फ लिप्सीला सुगावा लागला होता. मित्तल आणि मानवी यांच्यातील संबंध या मुद्द्यावरून गेल्या काही काळापासून ताणले गेले होते. त्यामुळेच अनोख मित्तलनं मानवीच्या हत्येचा कट रचून हल्लेखोरांना त्यासाठी पैसे दिले.

Story img Loader