AAP leader Attacked : आम आदमी पक्षाचे नेते अनोख मित्तल आणि त्यांची पत्नी मानवी उर्फ लिप्सी मित्तल यांच्यावर काही दरोडेखोरांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. धारदार शस्त्राने लुधियानाच्या डेहलोन भागात शनिवारी हा हल्ला करण्यात आला. दरम्यान चेहऱ्यावर आणि मानेवर चाकूने वार केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
लुटारू या जोडप्याची कार, तसेच महिलेने अंगावर घातलेले दागिने घेऊन पसार झाले. उद्दोगपती असलेले अनोख मित्तल हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डेहलोन पोलिस स्टेशनमधील एसएचओ सुखजींदर सिंग यांनी सांगितले की पाच वाजण्याच्या सुमारास शस्त्रधारी लुटारूंनी सिधवान कॅनल ब्रिजजवळ जोडप्याची गाडी थांबवली आणि त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला.
हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान मित्तल हे सुमारे तीन महिन्यांपूर्वी आपमध्ये सामील झाले आहेत आणि आमदार अशोक पराशर पाप्पी यांनी त्यांना पक्षात सहभागी करून घेतले होते.