आपचे नेते भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विकासाच्या दृष्टीने मोठे काम होईल, अशी आशा येथील जनतेला आहे. मुख्यमंत्रिपदाचा कारभार हाती घेताच भगवंत मान यांनी काही लोकप्रिय निर्णयदेखील घेतले आहेत. दरम्यान, आपचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मंत्री तसेच आपच्चा आमदारांना आज संबोधित केलंय. प्रत्येक मंत्र्याला विकासकामासाठी एक टार्गेट दिलं जाईल, असं केजरीवाल यांनी मंत्र्यांना सांगितलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मुख्यमंत्री भगवंत मान प्रत्येक मंत्र्याला एक टार्गेट देतील. दिलेल्या वेळेतच तुम्हा सर्वांना हे काम पूर्ण करावं लागेल. त्यासाठी रात्रंदिवस काम करावं लागेल. टार्गेट पूर्ण करु शकले नाही, तर तुम्हाला बदलण्याची मागणी पंजाबची जनता करेल,” असं अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या मंत्र्यांना सांगितलंय.

भाजपा चार राज्यातील विधानसभा निवडणूक जिंकली आहे. मात्र भाजपामधील अंतर्गत कलहाचा हा संदर्भ देत सर्वांनी एकजुटीने काम करावे लागेल असा सल्ला केजरीवाल यांनी पंजाबचे मंत्री आणि आपच्या आमदारांना दिला. “भाजपाने चार राज्यांतील निवडणूक जिंकलेली आहे. मात्र अंतर्गत कलहामुळे भाजपाने अद्याप कोठेही सरकार स्थापन केलेले नाही. त्यामुळे तुम्हा सर्वांना एकजुटीने भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल. मी तुमच्या मोठ्या भावाप्रमाणे आहे,” असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर सरकारी खात्यातील २५ हजार रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाने तशी मंजुरीदेखील दिलीय. तसेच आप सरकारतर्फे पंजाब भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी २३ मार्चपासून एक हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. या हेल्पलाईनवर लाच मागणाऱ्या किंवा गैरव्यवहार करणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्यांची चित्रफीत अपलोड करता येणार आहे. भगवंत मान सरकारने असे लोकप्रिय निर्णय घेतल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांनी मंत्री तसेच आमदारांना दिलेला सल्ला महत्त्वाचा ठरतोय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap leader arvind kejriwal gives instructions to punjab aap mla and ministers said will have to work harder prd