नुकत्यात हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका पार पडल्या असून आता लवकरच गुजरात विधानसभा निवडणुकांसाठीही मतदान होणार आहे. एकीकडे या निवडणुकांची देशाच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे दिल्ली महानगर पालिकेच्या निवडणुकांमुळे राजकारण तापलं आहे. काही महिन्यांपूर्वी दिल्लीच्या तीन महानगर पालिकांची एकच महानगर पालिका करण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात आल्यामुळे या निवडणुकांना राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालं आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पालिका निवडणुकांची चर्चा सुरू असताना दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीच्या एका नेत्यानं आपल्याला निवडणुकीचं तिकीट दिलं नाही, म्हणून थेट विजेच्या ट्रान्समीटरवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं घडलं काय?
दिल्ली पालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आम आदमी पक्षानंही पालिका निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली असून नुकतीच पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये आपलं नाव नसल्यामुळे आपचे एक माजी नगरसेवक चांगलेच संतप्त झाले. हसीब-उल-हसन असं त्यांचं नाव असून त्यांनी आपला निषेध नोंदवण्यासाठी भलताच मार्ग अवलंबला.
हसीब-अल-हसन यांना पक्षानं गेल्या निवडणुकीत पालिकेत निवडून आणलं होतं. मात्र, यंदा त्यांना निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं नाही. गेल्या काही दिवसांमध्ये आपनं तब्बल २५० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र, हसन यांचं नाव मात्र उमेदवार यादीत नसल्यामुळे त्यांनी निषेध करण्यासाठी थेट ट्रान्समीटर टॉवर गाठला!
“जर माझा मृत्यू झाला, तर त्यासाठी आपचे दुर्गेश पाठक, आतिषी हे असणार. कारण माझी सगळी मूळ कागदपत्र या लोकांनी जमा करून घेतली आहेत. उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मी वारंवार मागणी करूनही कागदपत्र दिली जात नाहीयेत. तुम्ही मला तिकीट द्या किंवा नका देऊ, पण माझी कागदपत्र मागणं हा माझा अधिकार आहे”, असं हसन यांनी सेल्फी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
दिल्लीतील शास्त्री पार्क मेट्रो स्टेशनजवळच्या टॉवरवर हसन हे चढून बसले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून हसन यांना खाली उतरवण्याची कार्यवाही केली जात आहे.