दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. गुजरात विधानसभा निवडणूक आणि दिल्ली महापालिका निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचला जात आहे, असे सिसोदिया यांनी म्हटले आहे. दिल्लीतील भाजपा खासदार मनोज तिवारी या कटात सामील असल्याचंही ते म्हणाले आहेत.
“मला सीबीआय, ईडीवर एक दिवसासाठी नियंत्रण दिल्यास…”, अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
‘आम आदमी पक्ष’ या नीच राजकारणाला घाबरणार नाही, असं सिसोदिया यांनी ट्वीट करत ठणकावून सांगितले आहे. “गुजरात आणि दिल्ली महापालिका निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं भाजपाने अरविंद केजरीवाल यांना मारण्याचा कट रचला आहे. भाजपा खासदार मनोज तिवारी उघडपणे त्यांच्या गुंडांना केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यास सांगत आहेत. या नीच राजकारणाला आप घाबरणार नाही. या गुंडगिरीला जनता उत्तर देईल”, असं ट्वीट सीसोदिया यांनी केलं आहे.
भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त करत ट्वीट केलं होतं. त्या ट्विटनंतर मनीष सिसोदिया यांनी तिवारी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “सततचा भ्रष्टाचार, दिल्ली महापालिका निवडणुकीत तिकीटांची विक्री आणि तुरुंगात बलात्काऱ्यांशी मैत्री आणि मसाज प्रकरणामुळे आपचे कार्यकर्ते आणि जनता संतप्त झाली आहे. त्यामुळे मला अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षिततेविषयी चिंता वाटत आहे. ‘आप’च्या आमदारांना मारहाणदेखील करण्यात आली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसोबत असं होऊ नये, न्यायालयानेच त्यांना शिक्षा करावी”, असं ट्वीट मनीष तिवारी यांनी केलं आहे. या ट्वीटनंतर आप नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.