राजस्थानमधील सत्तासंघर्ष अद्यापही सुरु असून यामध्ये आता आम आदमी पक्षदेखील लोकांसमोर पर्याय म्हणून उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे. आम आदमी पक्षाचे प्रवक्ता राघव चड्ढा यांनी काँग्रेस सध्या व्हेंटिलेटरवर असून विरोधी पक्ष करोना संकटावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असताना घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राघव चड्ढा यांनी काँग्रेसचं भवितव्य अंधारात असून पक्ष आणि देशालाही ते उज्ज्वल भविष्य देऊ शकत नाहीत. नवीन पिढीला त्यांनी पुढे येऊन पर्याय म्हणून संधी दिली पाहिजे असं म्हटलं आहे.
राघव चड्ढा यांच्या टीकेला दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलं असून, “तुम्ही केजरीवाल यांना मत दिल्यास अमित शाह दिल्लीचं सरकार चालवण्यासाठी मिळतात. काँग्रेस अशी ऑफर देऊ शकत नाही”, असा टोला लगावला आहे.
राघव चड्ढा यांनी सध्या करोनाचं संकट मोठं असून त्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असताना घाणेरडं राजकारण सुरु असल्याचा आरोप केला आहे. “एकीकडे आज करोनाचं सकंट असताना संपूर्ण देश राजकीय पक्ष एकत्र काम करतील अशी अपेक्षा करत असताना येथे एक राजकीय पक्ष आमदार विकत असून दुसरा पक्ष त्यांना खरेदी करत आहे”.
“संपूर्ण देश राजस्थानमधील राजकीय नाट्य पाहत आहे. हे घाणेरडं राजकारण पाहून देशातील जनता दुखावली आहे. अशा संकटाच्या परिस्थितीत राजकीय पक्षांचं घाणेरडं राजकारण पाहणं वेदनादायी आहे,” असं राघव चड्ढा यांनी म्हटलं आहे. यावेळी राघव चड्ढा यांनी काँग्रेस व्हेटिंलेटरवर असून वाचण्याची शक्यता फार कमी आहे, त्यामुळे आम आदमी पक्ष हा एकमेवर पर्याय असल्याचं म्हटलं आहे.
“काँग्रेस पक्षाचं कोणतंही भविष्य नसून देशालाही चांगलं भविष्य देऊ शकत नाहीत हे स्पष्ट झालं आहे. काँग्रेस पक्ष व्हेटिलेटरवर असून प्लाझ्मा किंवा रेमडेसिवीरही त्यांना वाचवू शकत नाही. लोकांना आता आम आदमी पक्षाकडूनच अपेक्षा आहेत. काँग्रेस पक्षाचं वय झालं असून खाली कोसळला आहे,” अशी टीकाही त्यांनी केली आहे. “आम आदमी पक्षाची देशभरात संघटनात्मक ताकद मोठी नाही याची आम्हाला कल्पना आहे. मात्र आता देशातील लोकांची आम आदमी पक्ष एकमेव पर्याय असल्याची खात्री झाली आहे,” असं राघव चड्ढा यांनी म्हटलं आहे.