Gujarat Aap Leader Viral Video: देशाची राजधानी दिल्लीमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काही महिन्यांत दिल्ली विधानसभा निवडणुकांचा आखाडा रंगणार आहे. आम आदमी पक्ष व भारतीय जनता पक्ष यांच्यातील राजकीय वाद, अरविंद केजरीवाल यांची अटक आणि जामीन अशा मुद्द्यांमुळे ते अधिकच तापलं आहे. पण एकीकडे दिल्लीत आम आदमी पक्षाची नेतेमंडळी आक्रमक राजकीय प्रचार करताना दिसत असताना पश्चिमेकडे गुजरातमध्ये मात्र आपच्या एका नेत्यानं चक्क स्वत:ला पट्ट्याने मारून घेतल्याचं समोर आलं आहे.
नेमकं घडलं काय?
गुजरातच्या सुरतमध्ये सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेदरम्यान आम आदमी पक्षाचे स्थानिक नेते गोपाल इटालिया उपस्थितांशी संवाद साधत होते. यावेळी भाषण करता करता अचानक त्यांनी कंबरेचा पट्टा काढला आणि स्वत:लाच मारायला सुरुवात केली. हा प्रकार पाहून उपस्थित श्रोत्यांबरोबरच व्यासपीठावर बसलेली नेतेमंडळी व सामाजिक कार्यकर्तेही भांबावले. काहींनी धावत जाऊन गोपाल इटालिया यांचा हात धरला आणि त्यांना स्वत:ला मारण्यापासून रोखलं. मात्र, त्यानंतरदेखील गोपाल इटालिया हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत राहिले.
या सगळ्या घटनाक्रमाला पार्श्वभूमी आहे ती अमरेलीमध्ये घडलेल्या एका घटनेची. अमरेलीमधील एका महिलेला भाजपा आमदार कौशिक वेकारिया यांना सोशल मीडियावर बदनाम करण्याच्या कटात सहभागी असल्याच्या संशयातून अटक करण्यात आली होती. २९ डिसेंबर रोजी या महिलेला अटक झाली. पण त्यानंतर अमरेली सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती रिझवान बुखारी यांनी जामीन मंजूर केला. तक्रारदार पक्षानंही यावर आक्षेप घेतला नाही.
महिलेचा व्हिडीओ व्हायरल
मात्र, यानंतर सदर महिलेची पोलिसांनी धिंड काढल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला. अटक झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातं. या प्रकाराबाबत आपल्या भाषणात गोपाल इटालिया संताप व्यक्त करत होते. तसेच, सदर महिलेला आपण न्याय देऊ शकलो नाही, याची खंत गोपाल इटालिया यांनी भाषणात बोलून दाखवली. याची शिक्षा म्हणून पट्ट्याने मारून घ्यायला त्यांनी सुरुवात केली.
“गुजरातमध्ये गेल्या काही काळात अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. मोरबी पूल दुर्घटना, वडोदरा बोट दुर्घटना, विषारी दारू प्रकरण, आगीच्या घटना, सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षेचे पेपर लीक होणे अशा अनेक घटनांचा त्यात समावेश आहे. पण या घटनांमधील पीडितांना न्याय मिळवून देण्यात मी कमी पडलो”, असं म्हणत इटालिया यांनी स्वत:ला पट्ट्याने मारून घ्यायला सुरुवात केली होती.
“आज जेव्हा मी अमरेलीच्या घटनेवर बोलत होतो, तेव्हा मला याचं आश्चर्य वाटत होतं की गुजरातमध्ये कुणालाच न्याय मिळत नाही असं कसं होऊ शकेल?”, अशी प्रतिक्रिया नंतर गोपाल इटालिया यांनी माध्यमांना दिली.