गेले काही दिवस सुरू असलेल्या आम आदमी पार्टीतील वादंगाने बुधवारी वेगळेच वळण घेतले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सकाळी पक्षाच्या निमंत्रक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बंडाचा झेंडा फडकाविल्याचा आरोप असलेले आपचे नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण या ज्येष्ठ नेत्यांची राजकीय व्यवहार समितीमधून (पीएसी) हकालपट्टी करण्यात आली. त्याचबरोबर केजरीवाल यांनी दिलेला पक्षाच्या निमंत्रकपदाचा राजीनामाही फेटाळण्यात आला.
योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी केजरीवाल यांच्या निमंत्रकपदावरून घेतलेल्या आक्षेपांबाबत निर्णय घेण्यासाठी बुधवारी आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आपला मिळालेल्या यशाच्या पाश्र्वभूमीवर या बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो त्याकडे साऱ्या देशाचे लक्ष होते. त्यात यादव आणि भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे प्रमुख रणनीतीकार अशी ओळख असलेले यादव यांच्याकडून प्रवक्तेपदाचीही जबाबदारीही काढून घेण्यात आली. पक्षातील घडामोडींची माहिती पत्रकाराला दिल्याबद्दल बैठकीत यादव यांच्यावर टीका करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला अरविंद केजरीवाल हजर नव्हते. यादव आणि मला पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीमध्ये स्थान देऊ नये, असा निर्णय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे प्रशांत भूषण यांनी सांगितले.
मात्र पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता या नात्याने पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती पार पाडण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे यादव यांनी नंतर सांगितले. बैठकीपूर्वी यादव यांनी नरमाईची भूमिका घेतली. पक्षात वाद असल्याचे जे चित्र रंगवले जात आहे, ती संधी असल्याचे वक्तव्य यादव यांनी केले होते.
पक्षातील नेत्यांमध्ये वैयक्तिक मतभेद असले तरी त्यामुळे पक्षात फूट पडणार नाही, असे आपचे नेते कुमार विश्वास यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा