नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या उच्चपदस्थ नेत्यांनी रविवारी येथील जंतरमंतरवर एक दिवसाचे उपोषण केले. भाजप हुकूमशाहीचा अवलंब करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षाचे अनेक कार्यकर्ते व समर्थक यांनी देशभक्तीपर गीते गात आणि केजरीवाल यांच्या गजाआडच्या प्रतिमा दर्शवणारे पोस्टर्स झळकावत या उपोषणात भाग घेतला. इतर राज्यांमध्ये, तसेच बोस्टनमधील हार्वर्ड चौक, लॉस एंजल्समधील हॉलीवूड साइन, वॉशिंग्टन डीसीमधील भारतीय राजदूतावासाबाहेर, न्यू यॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये, त्याचप्रमाणे टोरांटो, लंडन व मेलबर्न यांसह परदेशातही अशाच प्रकारे निषेध व्यक्त करण्यात आला, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. गोपाल राय, सौरभ भारद्वाज, कैलाश गहलोत व इम्रान हुसेन हे मंत्री जंतरमंतरवर झालेल्या ‘सामूहिक उपवासात’ सहभागी झाले.

हेही वाचा >>> ‘बेरोजगारी हा निवडणुकीतील मोठा मुद्दा’

केजरीवाल यांच्या राजीनाम्यासाठी भाजपची निदर्शने

नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्ली भाजपचे नेते व कार्यकर्ते यांनी रविवारी मध्य दिल्लीतील कनॉट प्लेसवर निदर्शने केली.

निदर्शकांनी केजरीवाल यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या सरकारी बंगल्याची प्रतिकृती ‘शीशमहल’ या नावाने झळकावली आणि त्याच्या बांधकामात अनियमितता झाल्याचा आरोप केला.

कथित मद्य धोरण घोटाळयात आरोपी असलेल्या ‘आप’ नेत्यांच्या दारूच्या बाटल्यांच्या आकाराच्या कट आऊटसह ‘शराब से शीशमहल’ या नावाचा सेल्फी पॉइंटही निदर्शन स्थळी उभारण्यात आला होता. दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव, पक्षाचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार, आमदार व नगरसेवक यांच्यासह दिल्ली भाजपचे वरिष्ठ नेते निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी केजरीवाल यांच्याविरुद्ध घोषणा देत त्यांच्या अटकेची मागणी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap leaders hold collective fast to protest against arvind kejriwal s arrest by ed zws
Show comments