लोकसभा निवडणुकांसाठी कोणताही पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करतो. आम आदमी पक्षाने मात्र इतर पक्षांतल्या भ्रष्ट नेत्यांची यादीच जाहीर करायला सुरुवात केली असून त्यांच्याविरोधात ‘आप’ले उमेदवार उभे करण्याची प्रतिज्ञाही केली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या यादीत शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची नावे जोडण्यात आली आहेत.
पक्षप्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या यादीत ही नावे का नव्हती, असे पत्रकारांनी विचारता पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राजकीय व्यवहारविषयक समितीचे सदस्य गोपाल राय म्हणाले की, कार्यकर्त्यांनी शुक्रवारच्या यादीचा आढावा घेऊन ही नावे सुचविल्याने ती जोडली आहेत. हे दोघे भ्रष्ट आहेत, असे नव्हे पण या दोघांनी भ्रष्ट नेत्यांची पाठराखण केली आहे आणि त्यांचे राजकारणही तत्त्वभ्रष्ट आहे. मोदी हे द्वेषमूलक राजकारण करीत असल्याने त्यांचेही नाव जोडले आहे. पक्षाचे नेते योगेंद्र यादव म्हणाले की, मोदी यांना कोणत्या अर्थाने भ्रष्ट ठरवायचे हा माध्यमांचा विशेषाधिकार आहे.
राय म्हणाले की, भ्रष्ट, गुंड नेत्यांना रोखण्याच्या एकमेव मुद्दय़ावर आम्ही लोकसभा निवडणूक लढविणार आहोत. घराणेशाहीच्या आधारावर संसदेत जागा पटकाविणाऱ्या नेत्यांनाही आमचा विरोध राहणार आहे.
तामिळनाडूत प्रतिमा जाळली
भ्रष्ट नेत्यांच्या यादीवरून तामिळनाडूत केजरीवाल यांची प्रतिमा जाळण्यात आली आणि निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या. केजरीवाल यांनी आमची नावे मागे घेतली नाहीत तर त्यांच्यावर खटला भरू, असा इशारा तामिळनाडूतील कथित भ्रष्ट नेत्यांनी केली आहे.
दरम्यान, आम आदमी पक्ष हा डाव्या पक्षांना पर्याय ठरूच शकत नाही, असा पुनरूच्चार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी केला आहे. दिल्ली वगळता आम आदमी पक्ष देशात कुठेही वाढण्याची चिन्हे नाहीत, असेही करात यांनी पत्रकारांना सांगितले.
हे सवंग प्रसिद्धीचे तंत्र
कथित भ्रष्ट नेत्यांची यादी म्हणजे ‘आप’चे सवंग प्रसिद्धीतंत्र आहे, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी केली. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग आणि नितीन गडकरी यांना भ्रष्ट ठरविण्याचा कोणता नैतिक अधिकार केजरीवाल यांना आहे, असा सवालही त्यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा