AAP MLA Amanatullah Khan Son hassle with Traffice Police Viral VIDEO : आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या मुलाने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातल्याचा व त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याची दुचाकी जप्त केली आहे. खान हा विरुद्ध दिशेने (उलट्या बाजूने) दुचाकी चालवत होता. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवलं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चालक परवाना व आरसी बूकची मागणी केली. त्याच्याकडे ना परवाना होता ना आरसी बूक. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याला दंड भरण्यास सांगितले. त्यावर तो पोलिसांना म्हणाला, “माझे वडील आमदार आहेत. तुम्ही माझ्याकडून दंड कसा काय आकारू शकता?”
पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की आगामी प्रजासत्ताकदिनानिमित्त (२६ जानेवारी) जामिया नगरचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) इतर पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर बंदोबस्ताचं काम करत होते. तसेच परिसराची टेहळणी करत होते. यावेळी बाटला हाऊसमधील नफीस रोडवर एक बुलेटचालक विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आला. या तरुणाने त्याच्या बुलेटला मॉडिफाय केलेलं सायलेन्सर लावलं होतं, ज्यामुळे कर्कश आवाज येत होता. त्याच्याबरोबर त्याचे इतरही काही मित्र होते जे विरुद्ध दिशेने व वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली दाखवत बेजबाबदारपणे दुचाकी चालवत होते. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या दुचाकीस्वारांना थांबवलं. तसेच त्यांच्याकडे परवाना व आरसी बूकची मागणी केली. त्यानंतर यापैकी एक दुचाकीस्वार पोलिसांवर आवाज चढवून बोलू लागला. त्याने स्वतःची आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्लाह खान यांचा मुलगा अशी ओळख सांगितली. तसेच तो पोलिसांवर अरेरावी करत होता. दुसऱ्या बाजूला, या तरुणाने दावा केला आहे की “माझ्या दुचाकीवर आम आदमी पार्टीचं निवडणूक चिन्ह असल्यामुळेच मला रोखण्यात आलं”.
दोन्ही दुचाकीचालकांकडे चालक परवाना व आरसी बूक नव्हतं. तसेच त्यापैकी एक तरुण पोलिसांना म्हणाला, “मला चालक परवान्याची गरज नाही. मी आमदाराचा मुलगा आहे. तुम्ही माझ्याकडून दंड आकारू शकत नाही”.
दुचाकीचालक आपली दुचाकी तिथेच सोडून पळून गेले
हा तरुण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने अमानतुल्लाह खान यांना फोन केला. त्याने एसएचओंना फोन देत आमदार खान यांच्याशी बोलायला लावलं. त्याचवेळी हा तरुण दुचाकीवरून उतरला व त्याच्या साथीदारांबरोबर पळून गेला. पोलिसांनी दुचाकी जप्त केली आहे. या दुचाकीला मॉडीफाय केलेलं सायलेन्सर लावण्यात आलं आहे. तसेच दोन्ही दुचाकींचे चालक हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत होते. त्यांच्याकडे चालक परवाना व आरसी बूक नव्हतं.