आम आदमी पक्षाचे (आप) आमदार दिनेश मोहनिया यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी वृद्ध महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी अटक केली. मोहनिया यांनी त्यांच्याच मतदारसंघातील एका ६० वर्षीय महिलेशी गैरवर्तन करत तिच्या कानाखाली मारल्याचा आरोप आहे. त्यानंतर आज दिल्ली पोलिसांनी भर पत्रकार परिषदेतच त्यांना ताब्यात घेतले.
येथील तुघलकाबाद परिसरात मोहनिया भेट देण्यासाठी गेले असताना हा प्रकार घडला. मारहाण करण्यात आलेल्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, मोहनिया मतदारसंघात फिरत असताना तिने मोहनिया यांना ओळखले नाही. त्यामुळे मोहनिया यांचे समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी तिचा हात पिरगळला. मोहनिया यांनी हा प्रकार थांबविण्याऐवजी महिलेच्या कानाखाली लगावली. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मोहनिया यांच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान, या सगळ्या प्रकाराचा खुलासा करण्यासाठी मोहनिया यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र, पत्रकार परिषद सुरू असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, मोहनिया यांनी हे सगळे भाजपने रचलेले षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. एम.एम. खान यांच्या हत्याप्रकरणावरून लोकांचे लक्ष वळविण्यासाठी भाजप हे सगळे करत असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.