दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावरील कारवाईवरून आम आदमी पक्षाकडून पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ”केंद्रांतील मोदी सरकार काहीही करून दिल्लीतील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच केंद्रीय यंत्रणांचा वापर करून आमच्या आमदारांवर दबाव आणल्या जात आहे”, असा आरोप ‘आप’कडून करण्यात आला आहे.
हेही वाचा – “टोलनाके हद्दपार होणार”, टोलवसूलीसाठी नितीन गडकरींनी सांगितली ‘ही’ नवी योजना
‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेत, मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय यंत्रणांचा वापरकरून आम आदमी पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. ‘आप’च्या आमदारांना फोडून भाजपाने मनीष सिसोदिया यांचा एकनाथ शिंदे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला नाही.”, असे ते म्हणाले.
”आमच्या आमदारांना धमकावण्याचे प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक आमदारांना २०-२० कोटींची ऑफर देण्यात येत आहे. हे २० कोटी घ्या, अन्यथा मनिष सिसोदियांसारखा सीबीआय कारवाईचा सामना करा, अशी धमकी देण्यात येत आहे. ‘आप’चे आमदार अजय दत्त, संजीव झा, सोमनाथ भारती आणि कुलदीप कुमार, यांना भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांनी संपर्क साधला आहे, असा आरोपही संजय सिंह यांनी केला.
हेही वाचा – गुजरातमध्ये ‘आप’च्या धास्तीमुळे लवकरच भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष? ; केजरीवाल यांचा दावा
यासंदर्भात बोलताना सोमनाथ भारती म्हणाले ”सिसोदिया यांच्यावरील खटले खोटे आहेत हे भाजपाच्या नेत्यांना माहिती आहे. त्यांच्यावर वरिष्ठ नेत्यांचा दबाव आहे. त्यांना कोणत्याही परिस्थिती दिल्लीतील ‘आप’ सरकार पाडायचे आहे. भाजपच्या एका नेत्याने मला सांगितले की काहीही झाले तरी आम्ही दिल्ली सरकार पाडू.”