नवी दिल्ली: भारताला २१ व्या शतकातील विश्वगुरू व्हायचे असेल तर, देशाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्राचे नेतृत्व करावे लागेल. पण, ‘एआय’च्या क्षेत्रात भारत खूपच मागे पडलेला आहे. अमेरिकेकडे चॅट-जीपीटी, जेमिनी, ग्रोक यासारखी एआय प्रारूपे आहेत. चीनकडे डीपसिक, बायडूसारखी प्रारूपे आहेत. भारताकडे कोणते स्वदेशी ‘एआय’ प्रारूप आहे? अमेरिका, चीन या देशांनी पाच वर्षांपूर्वी ‘एआय’च्या क्षेत्रात संशोधन आणि विकासाला सुरुवात केली, या तुलनेत भारत कुठे आहे, असा लक्षवेधी सवाल राज्यसभेत शून्य प्रहरामध्ये आम आदमी पक्षाचे राघव चड्ढा यांनी केला.
‘एआय’ क्षेत्रातील क्रांतीचे भारताने नेतृत्व केले पाहिजे पण, आता भारत परदेशी ‘एआय’ प्रारूपांवर अवलंबून असल्याचे दिसते. भारत ‘एआय’चा निर्माता नव्हे तर ग्राहक बनला आहे. ‘मेक एन इंडिया’ नव्हे तर, ‘मेक एआय इन इंडिया’ असे घोषवाक्य असले पाहिजे. ‘एआय’ क्षेत्राच्या संशोधन व विकासासाठी अमेरिका ५०० अब्ज डॉलर तर चीन १३७ अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहे, त्या तुलनेत भारत केवळ १ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे, असे चड्ढा म्हणाले. २०१० ते २०२२ या १२ वर्षांमध्ये जगभरातील एकूण एआय पेटंटसाठी दाखल करण्यात आलेल्या नोंदणी अर्जांपैकी ६० टक्के अमेरिकेने, २० टक्के चीनने आणि फक्त ०.५ टक्के भारताने दाखल केले होते. स्वदेशी ‘एआय’ निर्मितीमध्ये भारत मागे पडल्याचा मुद्दा अधोरेखित केला.
विश्वगुरू तर भारतच!
राज्यसभेतील सदस्यांच्या मुद्द्यावर सभापती जगदीप धनखड नेहमी मार्मिक टिप्पणी करतात. राघव चड्ढा यांच्या एआय क्षेत्रातील उणिवांच्या मुद्द्यावर धनखड यांनी हसत-हसत, ‘विश्वगुरू तर भारतच होणार’, असे मत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही चड्ढांचे मुद्दे अत्यंत लक्षपूर्वक ऐकले. चड्ढांचे बोलणे संपल्यानंतर पवारांनी लगेचच चड्ढांना बोलावले. सभागृहाच्या शेवटच्या रांगेतील आसनावर जाऊन पवार बसले. त्यांनी चड्ढांना तिथे बोलावून घेतले. त्यानंतर सुमारे चार-पाच मिनिटे पवार चड्ढांशी चर्चा करताना पाहायला मिळाले. चड्ढांच्या म्हणण्यातील मुद्द्यांचे पवार स्वत: टिपण काढताना दिसले.