Parliament Monsoon Session 2023 : बनावट सह्यांच्या प्रकरणात आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. खासदार राघव चढ्ढा यांच्याविरोधात राज्यसभेत प्रस्ताव मांडला जात आहे. सभागृहात त्यांचं वर्तन अत्यंत निषेधार्ह असल्याचं भाजपा खासदारांचं म्हणणं होतं. त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभेचे खासदार पियुष गोयल राघव चढ्ढांवरील कारवाईवर म्हणाले, हे खूप गंभीर प्रकरण आहे.
पाच खासदारांनी असा दावा केला आहे की त्यांच्या संमतीशिवाय दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता. हा प्रस्ताव आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी मांडला. भारतीय जनता पार्टीचे तीन खासदार, बिजू जनता दल आणि एआयएडीएमकेच्या एका खासदाराचा यात समावेश आहे. या खासदारांनी या संपूर्ण प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर चड्ढा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
बिजू जनता दलचे सस्मित पात्रा, भाजपाचे नरहरी आमीन, भाजपाचे सुधांशू त्रिवेदी, नागालँडचे खासदार फांगनोन कोन्याक (भाजपा) आणि लोकसभेचे माजी उपसभापती थंबीदुरई (अण्णाद्रमुक) यांची नावं चढ्ढा यांच्या यादीत होती.
दरम्यान, राघव चढ्ढा हे या कारवाईनंतर सदनाबाहेर आले आणि प्रसारमाध्यमांना म्हणाले, “मी काहीच चुकीचं केलेलं नाही”. तसेच त्यांनी याप्रकरणी ट्वीटही केलं आहे. विशेषाधिकार भंगाचा अहवाल येईपर्यंत राघव चढ्ढा यांचं निलंबन कायम राहणार आहे.
हे प्रकरण समोर येताच राज्यसभेच्या उपसभापतींनी आश्वासन दिलं आहे की, या संपर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. याप्रकरणी तपास करून निर्णय घेतला जाईल.