Parliament Monsoon Session 2023 : मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. यावरून सोमवारी राज्यसभेतलं वातावरण तापलं होतं. विरोधी पक्षांनी मणिपूर प्रकरणावर राज्यसभेत चर्चा करण्याची मागणी केली होती. यावेळी एकीकडे राज्यसभेच्या कामकाजादरम्यान सभापती जगदीप धनखड आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यात जोरदार बाचाबाची सुरू होती. त्याचवेळी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंहदेखील त्यांची मागणी लावून धरत होते. यावेळी राज्यसभेच्या कामकाजात अडथळा आणल्याच्या कारणास्तव आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्यावर राज्यसभेच्या सभापतींनी कारवाई केली आहे.
खासदार संजय सिंह यांना पावसाळी अधिवेशनातून निलंबित केलं आहे. याप्रकरणी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सांगितलं की, संजय सिंह यांना अनेक वेळा इशारा दिल्यानंतरही ते कामकाजात अडथळा निर्माण करत होते. त्यामुळे त्यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आलं आहे. केंद्रीय उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गोयल म्हणाले, सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे, तरीदेखील ते कामकाजात अडथळा आणत होते.
राज्यसभेत आज (२४ जुलै) मणिपूरच्या विषयावरून सरकार आणि विरोधी पक्ष भिडल्याचं पाहायला मिळालं. मणिपूरप्रश्नी कोणत्या नियमांतर्गत चर्चा करायची यावरून दोन्ही बाजूच्या खासदारांमध्ये मतभिन्नता होती. सरकार नियम १७६ अंतर्गत या विषयावर चर्चा करण्यास तयार होतं. तर विरोधी पक्षांच्या मते नियम २६७ अंतर्गत चौकशी व्हायला हवी. या नियमांवरून राज्यसभेत नोटिसा बजावण्यात आल्या.
हे ही वाचा >> VIDEO : पंतप्रधानांनी आठवड्यापूर्वी उद्घाटन केलेल्या विमानतळाच्या छताचा भाग कोसळला
दरम्यान, संजय सिंह यांच्यावरील कारवाईवर आम आदमी पार्टीने नाराजी व्यक्त केली आहे. आप नेते सौरभ भरद्वाज म्हणाले, ही कारवाई दुर्दैवी आहे. आमची कायदेविषयक टीम या प्रकरणाची चौकशी करेल. संजय सिंह यांच्या निलंबनाविरोधात विरोधी पक्षांचे नेते राज्यसभेच्या सभापतींची भेट घेत आहेत. दरम्यान, याप्रकरणी राज्यसभेच्या सभापतींनी सभागृह नेत्यांची बैठक बोलावली असून या बैठकीला सुरुवात झाली आहे.