पीटीआय, खन्ना (पंजाब)
आम आदमी पक्षाने (आप) शनिवारी पंजाब आणि चंडीगडमधील मिळून लोकसभेच्या सर्व १४ जागा लढवण्याचे जाहीर केले. पंजाबमधील १३ आणि चंडीगडमधील एका जागेसाठी पंधरा दिवसांच्या आत उमेदवार जाहीर केले जातील असे पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सांगितल्यामुळे ‘इंडिया’ आघाडीला आणखी एक धक्का बसल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत रेशन घरपोच पोहोचवण्याच्या योजनेवर पंजाब सरकारने आयोजित केलेल्या बैठकीत केजरीवाल यांनी ही घोषणा केली. ‘आप’च्या उमेदवारांच्या विजयासाठी त्यांनी जनतेकडून आशीर्वाद मागितले. ते म्हणाले, ‘‘दोन वर्षांपूर्वी तुम्ही तुमचे आशीर्वाद दिलेत. तुम्ही आम्हाला ११७ पैकी ९२ जागा दिल्या. तुम्ही पंजाबमध्ये इतिहास घडवला. आज मी पुन्हा हात जोडून तुमचे आशीर्वाद घेतो. लोकसभेच्या निवडणुका दोन महिन्यांनी होणार आहेत. पंजाबमध्ये १३ जागा आहेत, चंडीगडमध्ये एक अशा एकूण १४ जागा लढवणार आहे, असे केजरीवाल म्हणाले.