पीटीआय, नवी दिल्ली

काँग्रेसने दिल्लीमधील सर्व सात लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असेल तर ‘इंडिया’ आघाडीला काही अर्थ उरत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आम आदमी पक्षाकडून व्यक्त करण्यात आली. दिल्लीमधील काँग्रेस नेत्यांची बुधवारी पक्षश्रेष्ठींबरोबर बैठक झाली, त्यानंतर काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी माहिती दिली की, काँग्रेस सर्व सातही मतदारसंघांमधून निवडणूक लढवणार आहे.

लांबा यांच्या वक्तव्यानंतर ‘आप’कडून संतप्त प्रतिक्रिया आली. ‘आप’च्या प्रवक्त्या प्रियंका कक्कर म्हणाल्या की, जर काँग्रेसला दिल्लीत एकटय़ाने लढायचे असेल तर ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यात काही अर्थ नाही. याबद्दलचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील असेही त्यांनी सांगितले.

यानंतर दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी खुलासा केला की, बुधवारची बैठक ही दिल्लीतील आघाडीविषयी चर्चा करण्यासाठी नव्हती आणि त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. ‘आप’चा काही समज होऊ शकतो, पण आघाडीविषयी निर्णय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून केला जाईल आणि त्यांच्याकडूनच जाहीर केला जाईल. तर माजी आमदार अनिल भारद्वाज म्हणाले की, याविषयी बोलण्यासाठी अलका लांबा यांना अधिकार देण्यात आलेले नाहीत.

त्यापूर्वी दिवसभरात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्ली राज्यातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच दिल्लीमध्ये काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मार्ग आणि साधने याविषयी चर्चा करण्यात आली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, दिल्लीचे काँग्रेस अध्यक्ष अनिल चौधरी आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन या वेळी उपस्थित होते. या वेळी माकन यांनी ‘आप’बरोबर निवडणूकपूर्व आघाडी करण्यातील समस्यांचा मुद्दा उपस्थित केल्याचे सूत्रांनी सांगितले, तर खरगे आणि राहुल यांनी नेत्यांना ऐक्य राखण्यास आणि लोकांशी संपर्क साधण्यास सांगितले.

Story img Loader