पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित दिल्ली महापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या शेली ओबेरॉय यांचा विजय झाला. त्यांनी भाजपच्या रेखा गुप्ता यांचा ३४ मतांनी पराभव केला. दिल्ली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत घोषणा केली. या निवडणुकीत २६६ जणांनी मतदान केले, त्यापैकी ओबेरॉय यांना १५० तर गुप्ता यांना ११६ मते मिळाली. काँग्रेसने मतदानात भाग घेतला नाही.

त्यानंतर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आपच्या आले मोहम्मद इक्बाल यांनी भाजपच्या कमल बार्गी यांचा ३१ मतांनी पराभव केला. इक्बाल यांना १४७ तर बार्गी यांना ११६ मते मिळाली. निकालानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेचे तसेच ओबेरॉय आणि आले इक्बाल यांचे अभिनंदन केले.

यापूर्वी तीन वेळा महापौरपदाची निवडणूक घेण्याचा प्रयत्न झाला होता, पण तिन्ही वेळा नामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या मुद्दय़ावरून गोंधळ होऊन निवडणूक होऊ शकली नव्हती. त्यानंतर आपच्या उमेदवार शेली ओबेरॉय यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नामनिर्देशित व्यक्तींना मतदानात सहभागी होता येणार नाही असे स्पष्ट केले होते. त्यानंतर नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी निवडणुकीसाठी सभा बोलावण्यास संमती दिली होती.

गुंडाचा पराभव झाला, जनतेचा विजय झाला. दिल्ली महापालिकेत जनतेचा विजय झाला आणि गुंडगिरी हारली. शेली ओबेरॉय यांची महापौरपदी निवड झाल्याबद्दल दिल्लीच्या जनतेचे अभिनंदन. – अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे प्रमुख