दिल्लीतील राजकीय अनिश्चितेचे ढग जवळजवळ दूर झाले आहे. आम आदमी पक्षाने सत्तास्थापनेचा निर्णय घेतला असून त्याची घोषणा रविवारी अरविंद केजरीवाल करतील. सत्तास्थापनेसाठी आठ विजयी उमेदवारांसह विनाशर्त पाठिंबा देण्याच्या काँग्रेसच्या प्रस्तावावर आम आदमी पक्षाने पत्र, फेसबुक, ट्विटर, पक्षाच्या संकेतस्थळावर नागरिकांची मते मागवली होती. बहुसंख्य नागरिकांनी आम आदमी पक्षाने सत्ता स्थापन करावे, असे सुचविले आहे.
बरोब्बर दोन आठवडय़ांनंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचे सावट दूर झाले आहे. ८ डिसेंबरच्या निकालानंतर दिल्ली विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. सत्तास्थापनेच्या जवळ असलेल्या भारतीय जनता पक्षाची त्यामुळे घोर निराशा झाली.
काँग्रेस व भाजपचे वर्चस्व मोडून काढत आम आदमी पक्षाने निवडणुकीत ऐतिहासिक विजय संपादित केला. २८ जागांसह आप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. प्रारंभी विरोधात बसण्याची प्रतिज्ञा घेतल्याने जनमताच्या रेटय़ापुढे सत्तास्थापनेचा निर्णय घेतला असल्याचे पक्षसूत्रांनी दै. ‘लोकसत्ता’स सांगितले. सत्ता स्थापन करण्याचा निर्णय झाला असला तरी मुख्यमंत्री कोण, यावर अद्याप निश्चिती झालेली नाही. मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार अरविंद केजरीवाल आहेत.
चौकसभांद्वारे लोकांशी संपर्क
 मंगळवार ते गुरुवारदरम्यान आम आदमी पक्षाने ४६ चौक सभा घेतल्या, तर शेवटच्या दोन दिवसांत २४ चौक सभांमधून आम आदमी पक्षाने नागरिकांची मते अजमावली. ‘आप’च्या संकेतस्थळावर केलेल्या आवाहनाला शनिवारी सायंकाळी साडेसातपर्यंत १४ हजार ४४८ प्रतिसाद दिला होता. याशिवाय २५ लाख पत्रकांच्या माध्यमातून नागरिकांकडून आपने मते मागवली होती. त्याच आधारावर सत्तास्थापनेचा निर्णय घेतला असल्याचे केजरीवाल यांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा